29 May 2020

News Flash

हिवाळी अधिवेशन सरकारला जड!

दादरी तसेच हरयाणातील घटनेवरून कोंडी करण्याची काँग्रेसची रणनीती

दादरी तसेच हरयाणातील घटनेवरून कोंडी करण्याची काँग्रेसची रणनीती
गोमांस भक्षण केल्याच्या संशयावरून दादरीत झालेली अखलाख यांची हत्या, फरिदाबादमध्ये दलित कुटुंबास जिवंत जाळण्याचा प्रयत्न तसेच हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासारख्या नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात सामाजिक सौहार्दतेच्या मुद्दय़ावरून नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारला घेरण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी फरिदाबादमध्ये ‘त्या’ दलित कुटुंबातील सदस्यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढविला. गेल्या काही दिवसांमध्ये सामाजिक सौहार्द धोक्यात आल्याने त्याचा जाब सरकारला विचारावा लागेल, अशी प्रतिक्रिया राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी दिली आहे.
सेवा व वस्तू कर विधेयक मंजूर करण्याच्या आशेवर बसलेल्या केंद्र सरकारला पुन्हा एकदा विरोधकांचा रोष सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी विरोधकांनी ललित मोदी प्रकरणावरून पावसाळी अधिवेशनात सरकारला सळो की पळो करून सोडले होते.
फरिदाबादमध्ये एका दलित कुटुंबास जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
राहुल गांधी म्हणाले की, गरीब व दलित मोदी सरकारच्या काळात सुरक्षित नाहीत. ते दलित व गरीब असल्यानेच त्यांना अशा रीतीने वागविले जात आहे. हे सरकार दुबळ्यांचे नाही. आरएसएस, मुख्यमंत्री (खट्टर), भाजप व पंतप्रधानांची हीच मानसिकता आहे. हा मुद्दा सतत जिवंत ठेवण्याचे अप्रत्यक्ष संकेतच राहुल गांधी यांनी स्वपक्षाच्या नेत्यांना दिले आहेत. त्यामुळे गुलाम नबी आझाद, ज्येष्ठ नेते आनंद शर्मा, लोकसभेतील सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेत दलित व मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सरकारला जाब विचारण्याची रणनीती आखली
आहे.
या मुद्दय़ावर बहुजन समाज पक्ष राज्यसभेत सरकारला धारेवर धरू शकतो. लोकसभेत अस्तित्व नसलेल्या बसपची राज्यसभेत मात्र भाजपला विविध विधेयकांसाठी मदत घ्यावी लागते. त्यामुळे बसपने ही संधी साधून सरकारविरोधात आवाज उठविण्याची रणनीती आखली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2015 2:27 am

Web Title: opposition target bjp this winter session
टॅग Rahul Gandhi
Next Stories
1 स्कॉर्पिन पाणबुडी खरेदीत दलाली नाही
2 पीटर मुखर्जीच्या माजी कर्मचाऱ्याचा शोध जारी
3 डाळींची दरवाढ रोखण्याच्या उपायांचा केंद्राकडून आढावा
Just Now!
X