निवडणूक आयोगाने अशा दहा नोटिसा बजावल्या, तरी मी मतदारांना धर्माच्या आधारावर विभाजित करण्यास विरोध सुरूच ठेवेन, असे ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी सांगितले.

भाजपचे स्टार कँपेनर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणात हिंदू व मुस्लीम मतपेढ्यांचा नेहमीच उल्लेख करतात. मग त्यांच्याविरुद्ध कुठलीही तक्रार का नोंदवली जात नाही, असा प्रश्न तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा असलेल्या ममता यांनी डोमजूर विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान विचारला. ‘तुम्ही (निवडणूक आयोग) मला १० कारणे दाखवा नोटिसा बजावू शकता, मात्र माझे उत्तर तेच राहील. हिंदू व मुस्लीम मतांमधील विभाजनाच्या मी नेहमीच विरोधात बोलेन. धार्मिक आधारावर मतदारांच्या विरोधातील माझी भूमिका मी बदलणार नाही’, असे त्या म्हणाल्या. नंदीग्राममधील प्रचारादरम्यान ‘मिनी पाकिस्तान’ शब्दाचा वापर करणाऱ्यांविरुद्ध किती तक्रारी दाखल झाल्या आहेत, असेही त्यांनी विचारले.

नोटिशीबद्दल तृणमूल काँग्रेसची टीका

ममता बॅनर्जी यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याबद्दल तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगावर टीका केली असून, भाजपविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवर आयोगाने काय कारवाई केली असा प्रश्न विचारला आहे.

निवडणूक आयोगाने ममतांवर नोटीस बजावली. मात्र भाजप उमेदवार पैसे वाटत असल्याचा ध्वनिचित्रफीत पुरावा तृणमूल काँग्रेसने सादर केला, तसेच भाजपच्या सभेला हजर राहण्यासाठी व त्या पक्षाला मतदान करण्यासाठी रोख रकमेचे कूपन वाटण्यात येत असल्याचीही तक्रार केली. त्याचे काय झाले, असा प्रश्न तृणमूलच्या प्रवक्त्या महुआ मोइत्रा यांनी विचारला. आयोगाने निदान नि:पक्षपातीपणाचे नाटक करावे, असा टोला त्यांनी हाणला.

प्रकरण काय?

धर्माच्या आधारावर मते मागितल्याबद्दल निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना बुधवारी नोटीस बजावली असून, त्यांना ४८ तासांत नोटिशीला उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. हुगळी जिल्ह््यातील तारकेश्वर येथे ३ एप्रिलला घेतलेल्या निवडणूक प्रचारसभेत ममता यांनी मुस्लीम मतदारांना तुमच्या मतांचे वेगवेगळ्या राजकीय पक्षांत विभाजन होऊ देऊ नका, असे आवाहन केले होते. याबाबत भाजपच्या प्रतिनिधी मंडळाने तक्रार केली.