नवी दिल्ली : उन्नाव आणि हैदराबाद येथील बलात्कार प्रकरणांवरून शुक्रवारी लोकसभेत जबरदस्त खडाजंगी झाली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विधानावर आक्षेप घेत केरळ काँग्रेसच्या दोन खासदारांनी प्रचंड गदारोळ केला. त्यावर इराणी यांनीही ‘आव्हाना’चा आविर्भाव दाखवला. सदस्य मुद्दय़ावरून गुद्दय़ावर येण्याची भीती निर्माण झाल्यामुळे लोकसभेचे कामकाज अर्ध्या तासासाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी बोलत असताना केरळ काँग्रेसचे खासदार टी. एन. प्रतापन आणि खासदार डीन कुरिओकोसे यांनी अचानक ‘आक्रमक’ पवित्रा घेतला आणि ते लोकसभाध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत धावून गेले. इराणी यांच्या अंगावर धावून जात असल्याचाच त्यांचा आवेश होता. त्यांच्या या आक्रमकतेबाबत आणि महिला मंत्र्याला दिलेल्या वागणुकीबद्दल प्रतापन आणि डीन कुरिओकोसे यांच्या माफीची मागणी भाजपच्या सदस्यांनी केली.

केरळ काँग्रेसचे दोन्ही खासदार आणि इराणी यांच्यात इतकी खडाजंगी झाली की, तिघांचेही ‘संतापी कृत्य’ आवरण्यासाठी दोन्ही बाजूंकडील खासदारांना धावावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लगेचच हस्तक्षेप केला. सुळे यांच्या मदतीला काँग्रेसचे अन्य खासदारही धावले. भाजपकडूनही रमा देवी, संगीता देवी आदी महिला खासदारांनी इराणी यांना कसेबसे थांबवले आणि प्रल्हाद पटेल यांनीही इराणी यांच्याकडे धाव घेतली.

शून्य प्रहरामध्ये महिलांवरील बलात्काराच्या घटनांवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी चर्चेस परवानगी दिली.

‘दादा, तुमच्यासारख्या पुरुषांमुळेच!’

अरेरावीचा प्रकार झाल्यानंतर सभागृह तहकूब झाले तरी संतापलेल्या स्मृती इराणी पहिल्या बाकावर बसूनच होत्या. त्यांनी सौगाता राय यांनाच धारेवर धरले. दादा तुमच्या सारख्या पुरुषांमुळेच.. असे इराणी सौगातदादांना म्हणत होत्या. मालदाचे उदारण दिले तेव्हा दादांनी हस्तक्षेप केला होता. त्यानंतरच काँग्रेसचे खासदार इराणींच्या विरोधात आक्रमक झाले होते. दादा इराणी यांच्याकडे गेले. त्यांनी हात जोडून इराणींचे म्हणणे ऐकून घेतले. पण, इराणी बोलत राहिल्या, हे पाहून सुप्रिया सुळे आणि अन्य तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी दादांना सभागृहाबाहेर नेले.