16 October 2019

News Flash

भ्रष्टाचारासाठीच काँग्रेसला कमकुवत सरकार हवे

पंतप्रधान मोदींची टीका; ‘२००४-२०१४ हा वाया गेलेला कालखंड’

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदींची टीका; ‘२००४-२०१४ हा वाया गेलेला कालखंड’

२००४ नंतर अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी कायम असते तरी देशाचे भले झाले असते. काँग्रेसचा दहा वर्षांचा (२००४-२०१४)  कालखंड वाया गेलेला आहे. काँग्रेसची महाआघाडी दूरदृष्टी नसलेली, वैचारिक विरोधाने भरलेली आहे. कमकुवत सरकार आणून भ्रष्टाचार करण्याचे यांचे मनसुबे आहेत. भाजपला मात्र देशाचा विकास साधायचा आहे. मग, केंद्रात सरकार मजबूत हवे की गलितगात्र (मजबूर), असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला.

भाजपच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोपात मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षा देशातील मतदारांना उद्देशून भाषण केले. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे पानिपत होऊ देऊ नका, असे आवाहन पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी केले होते.

देशाचा प्रधान सेवक कसा हवा हे जनतेने ठरवावे. न थकता १८ तास दिवसरात्र काम करणारा की, दोन-दोन महिने सुट्टीवर जाणारा; सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा हवा की समाजात फूट पाडणारा हवा;  पैसे चोरून स्वतच्या कुटुंबामध्ये ते वाटणारा हवा की, देश भ्रष्टाचारमुक्त करणारा हवा; देशाचा आदर करणारा हवा की, शेजारील देशाकडे चुगल्या करणारा हवा; असे प्रश्न उपस्थित करून मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी पर्याय असू शकत नाहीत, असा मुद्दा अप्रत्यक्षरीत्या मांडला.

काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले की, काँग्रेसला विकासाचे वावडे आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला विरोध केला. अन्य मागासवर्गाच्या आयोगाला घटनात्मक दर्जा, नागरिकत्व विधेयक, तिहेरी तलाक विधेयकालाही विरोध केला. शेतकऱ्यांना मतांसाठी कर्जमाफी दिली. अन्नदात्याला मतदाता एवढीच किंमत दिली. भाजप सरकारने मात्र कठोर वाटणारी पण, शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा देणारी धोरणे राबवली आहेत. राफेलमध्ये कोणताही घोटाळा नसल्याचे समजावून सांगितले पण, काँग्रेसने झोपेचे सोंग घेतले आहे.. अशा देशविरोधी काँग्रेस आघाडीला मतदारांनी निवडून देऊ नये. विकास शक्ती, सैनिकांचा गौरव, जनसेवा, समता-ममता-समरसता, नवा भारत घडवणाऱ्या सरकारचीच निवड करण्याचे आवाहन मोदींनी केले.

गुजरातमध्ये कधी ‘सीबीआय’वर बंदी घातली?

सीबीआयच्या संचालकपदावरून अलोक वर्माच्या उचलबांगडीच्या पाश्र्वभूमीवर मोदींनी काँग्रेसवर सीबीआयच्या गैरवापराचा आरोप केला. गुजरातचा मुख्यमंत्री असताना १२ वर्षे काँग्रेसने सीबीआय तसेच, अन्य यंत्रणांची चौकशी मागे लावली. सातत्याने त्रास दिला. अमित शहांना तुरुंगात टाकले. २००७ मध्ये काँग्रेसच्या तत्कालीन मंत्र्याने मोदी तुरुंगात जाईल असे भाकीत वर्तवले होते. मी चौकशीला सामोरा गेलो. नऊ तास सलग चौकशी केली गेली. पण, मी कधीही गुजरातमध्ये सीबीआयवर बंदी आणली नाही. मी नेहमीच व्यक्तीपेक्षा संस्थेला मोठे मानतो. आता मात्र, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, छत्तीसगढच्या सरकारांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना प्रवेश करण्यास मनाई केली आहे. काँग्रेसची ही राजेशाही असून त्यांना लोकशाही मान्य नसल्याची टीका मोदी यांनी केली.

विकास हाच मंत्र

सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर देशाचे भविष्य बदलले असते. २००४ नंतर वाजपेयी पंतप्रधानपदी कायम असते तरी देशाचे भले झाले असते. काँग्रेसने मात्र दहा वर्षे देशाला काळोखात नेले. २०१४मध्ये भाजप सरकारने देशाला नवी दिशा दाखवली. राष्ट्रनिर्माणासाठी ऊर्जा दिली. देश बदलत असून विकास हाच एकमेव मंत्र घेऊन भाजप काम करत आहे. त्यात, प्रादेशिक अस्मितांनाही स्थान देण्यात आले आहे. आर्थिक दुर्बलांसाठी मिळणाऱ्या आरक्षणामुळे तरुण पिढीला आकांक्षापूर्तीकडे नेणारे असल्याचे मोदी म्हणाले. महिला सक्षमीकरणासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने कोणती धोरणे राबवली याची माहितीही मोदींनी दिली.

‘चौकीदार पकडणारच’

स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्रात भ्रष्टाचारमुक्त सरकार आले. काँग्रेसच्या काळात बँकांकडून कर्ज मिळवण्याच्या दोन पद्धती होत्या. सामान्य लोक बँकेकडून कर्ज घेऊन घर बनवत. मुलांचे शिक्षण करत. पण, काँग्रेसची रीत वेगळी होती. नामदाराच्या एका फोनवर लाखो कोटींची कर्जे दिली जात. ही कर्जे फेडण्यासाठी पुन्हा कर्जे पुरवली जात. काँग्रेसच्या भ्रष्टाचारामुळेच बँकांची दुर्दशा झाली. नोकरदार-मध्यमवर्ग कंगाल झाले. भाजप सरकारने ‘काँग्रेस रीत’ मोडून काढली. आता राजदारांनाही कायद्याला सामोरे जावे लागत आहे. काँग्रेस सरकारच्या काळात हेलिकॉप्टरचीच नव्हे तर राफेल विमानांची खरेदी दलालांमुळे रखडली. पण, आता चोर कुठेही असो चौकीदार त्यांना पकडणारच, असे मोदींनी सांगितले.

राम मंदिरात काँग्रेसचीच आडकाठी

संघ परिवाराकडून राम मंदिर उभारणीसाठी भाजपवर दबाव येत आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी राम मंदिर बांधण्याचा निर्धार व्यक्त केल्यानंतर मोदींनीही त्यावर भाष्य केले. राम मंदिराचा वाद संपवावा असे काँग्रेसलाच वाटत नाही. न्यायालयीन प्रक्रियेत काँग्रेसचे वकील सातत्याने आडकाठी करत आहेत. सरन्यायधीशांवर महाभियोग चालवण्याचा काँग्रेसचा विचार होता, असा मुद्दा मोदी यांनी मांडला.

जिजाऊंचे स्मरण

‘शिवाजी महाराजांना त्यांची माता जिजाऊंनी स्वराज्य स्थापन कर असे सांगितले होते. याच जिजामातेची प्रेरणा मला सांगत आहे की, सुराज्याची स्थापना कर. निर्धाराने पुढे जा!’ असे म्हणत मोदींनी जिजाऊंना जयंतीनिमित्त वंदन केले.

भाजप कायदा मानतो!

सीबीआय, रिझव्‍‌र्ह बँकेच्या कारभारातील मोदी सरकारच्या हस्तक्षेपावर विरोधकांनी केलेल्या आरोपाचे उत्तर देताना मोदींनी, काँग्रेसलाच संस्थांची कदर नसल्याचा प्रत्यारोप केला. काँग्रेस म्हणजे निव्वळ नामदार कुटुंब असून तेही जामिनावर सुटलेले आहे. काँग्रेसला सीबीआय, रिझव्‍‌र्ह, कॅग, न्यायालय नको. काँग्रेसचा कायद्यावर, घटनेवर विश्वास नाही. अशा पक्षांकडे देशाची सत्ता द्यायची? भाजप डॉ. आंबेडकर मानतो. राज्यघटनेचा आदर करतो. कायदे मानतो, असा दावा मोदींनी केला.

First Published on January 13, 2019 1:08 am

Web Title: opposition wants a majboor sarkar country but country wants majboot sarkar narendra modi