आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत राहणाऱ्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आज (सोमवार) पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. विरोधकांकडून मारक शक्तीचा प्रयोग केला जात असल्याने भाजपा नेत़्यांचे निधन झाल्याचा अजब दावा त्यांनी केला आहे. या विधानामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भोपाळमध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांच्या श्रद्धांजली सभेत साध्वी प्रज्ञासिंह यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत.

साध्वी म्हणाल्या, “एकदा एका आध्यात्मिक महाजारांनी मला सांगितले होते की, सध्या भाजपाचा वाईट काळ सुरु असून यामागे विरोधकांचा हात आहे. विरोधकांकडून भाजपाविरोधात मारक शक्तीचा प्रयोग केला जात आहे. महाराजांनी सांगितलेली ही बाब मी नंतर विसरुन गेले. त्यानंतर आता आमचे वरिष्ठ नेते एकामागून एक हे जग सोडून जात असताना मला त्या महाराजांच्या विधानावर विचार करायला भाग पाडले आहे.”

दरम्यान, भाजपाने साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विधानावर मौन बाळगले आहे. मध्य प्रदेशचे नेते प्रतिपक्ष गोपाल भार्गव आणि राष्ट्रीय सरचिटणीस यांनी साध्वीच्या या विधानावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तर काँग्रेसने खासदारांच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.

यापूर्वी साध्वी प्रज्ञासिंह यांनी दोनदा वादग्रस्त विधाने केली होती. मी गटार आणि तुमचे शौचालय साफ करण्यासाठी खासदार झालेले नाही असे त्यांनी म्हटले होते. तसेच लोकसभा निवडणुकीदरम्यान, त्यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले होते.