News Flash

‘इनहेलर’च्या माध्यमातून लस देण्याचा पर्याय

लंडनच्या ‘इम्पिरियल कॉलेज’चे संशोधन

(संग्रहित छायाचित्र)

 

करोना विषाणूचा प्राथमिक संसर्ग हा श्वसनमार्गातून सुरू होत असल्याने तेथेच त्याला प्रतिकार करण्यासाठी इनहेलरच्या माध्यमातून लस देण्याच्या पर्यायावर विचार सुरू असल्याचे लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या संशोधकांनी म्हटले आहे.

त्यांनी याबाबत संशोधन सुरू केले असून तोंडावाटे इनहेलरच्या माध्यमातून लस देणे जास्त परिणामकारक ठरणार असल्याचा निष्कर्ष काढला आहे. ब्रिटनमध्ये ज्या दोन लशी तयार करण्यात आल्या आहेत त्यांची परिणामकारकता व सुरक्षितताही तपासण्यात येत आहे. कोविड १९ प्रायोगिक लशी लंडनचे इम्पिरियल कॉलेज व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी तयार केल्या आहेत. त्या श्वसनमार्गातून देता येतील का, यावर विचार सुरू आहे.

इन्फ्लुएंझामध्ये नाकात फवारा मारण्याच्या लस पद्धतीने जास्त चांगले परिणाम दिसून आले आहेत. तसाच पर्याय कोविड १९ म्हणजे सार्स सीओव्ही२ रोखण्यासाठी अवलंबला जाऊ शकतो, असे इम्पिरियल नेटवर्क फॉर व्हॅक्सिनचे ख्रिस शिवू यांनी सांगितले. यात श्वसनमार्गातील पेशींवर औषध पडल्याने प्रतिकारशक्ती वाढून विषाणू शरीरात खोलवर जाण्यापूर्वीच निकामी होतील. सध्याचा विषाणू हा श्वसनमार्गातून पसरत आहे. तो नाक, घसा व फुप्फुसातून आत जातो, तेथेच विषाणूला प्रतिकार करणे महत्त्वाचे आहे असे शिवू यांचे मत आहे.

ब्रिटिश सरकार व व्यापारमंत्री आलोक शर्मा यांनी कोविड लशीच्या ब्रिटनमधील प्रकल्पांचे स्वागत केले असून १३० दशलक्ष पौंडाची मदत दिली आहे. शर्मा यांनी सांगितले की, लोकांना लस मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वैद्यकीय चाचण्या वेगाने करण्यात येत आहेत. शिवू हे इम्पिरियलचे प्राध्यापक रॉबिन श्ॉटॉक व ऑक्सफर्डच्या प्राध्यापक सारा गिलबर्ट यांच्यासमवेत लस कुठल्या पद्धतीने द्यायची यावर विचार करीत आहेत. अस्थमा औषधे दिली जातात त्या एरोसेल पद्धतीने काही स्वयंसेवकांना लस दिली जाणार आहे. नाक, घसा, श्वसनमार्गावर लशीचा परिणाम समजण्यासाठी इन्हेलर पद्धत वापरावी लागेल, असे प्रा. श्ॉटॉक यांचे मत आहे.

३० जणांवर चाचण्या..

प्रा. गिलबर्ट यांनी म्हटले, की त्यांच्या एझेडडी १२२२ लशीने स्नायूत टोचल्यानंतर चांगले परिणाम दाखवले आहेत. ती श्वसनमार्गात इनहेलर पद्धतीने दिली तरी चांगली काम करेल असा विश्वास आहे. त्यासाठी ३० लोकांवर चाचण्या केल्या जाणार असून यात १८ जणांना तीन मात्रा, तर बारा जणांना सहा मात्रा याप्रमाणे ‘एरोसोल’चे फवारे दिले जातील, नंतर त्यांची ब्राँकोस्कोपी केली जाईल. ही लस एरोसोल नेब्युलायझर पद्धतीने दिली जाणार असून त्यानंतर रक्तातील इम्युनोग्लोब्युलिनचे प्रमाण नाकातील नमुने घेऊन तपासले जाईल. त्यामुळे नाक, घसा यातील आयजीए प्रतिपिंडांचे प्रमाणही समजेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:25 am

Web Title: option to vaccinate through inhaler abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 माजी मंत्री अरुण शौरी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे आदेश
2 चीनकडूनच करारांचे उल्लंघन
3 चीनच्या पाळत प्रकरणाच्या अभ्यासासाठी समिती
Just Now!
X