चांद्रयान-२ मधील विक्रमचं हार्ड लँडिंग नेमकं कशामुळे झालं? ती कारण शोधून काढण्याचे प्रयत्न इस्रोकडून सुरु आहेत. ऑर्बिटरने विक्रमच्या लँडिंगच्या जागेचे फोटो पाठवले असून त्याचे विश्लेषण सुरु आहे. इस्रोच्या नियंत्रण कक्षाचा लँडरशी अजूनही संपर्क प्रस्थापित होऊ शकलेला नाही. पुढचे १४ दिवस संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ऑर्बिटरने शनिवारीच हा फोटो पाठवला होता. पण फोटोत दिसणारी ती वस्तू विक्रमच आहे याची आम्हाला खातरजमा करायची होती. लँडिंगच्या जागेचे ठराविक अक्षांश आणि रेखांशावरुन काढण्यात आलेले जुने फोटो आम्ही तपासले. त्यावेळी जुन्या फोटोंमध्ये तिथे काहीही दिसत नव्हते. पण नव्या फोटोमध्ये वस्तू स्पष्ट दिसत होती. त्यावरुन तो विक्रम लँडरच असल्याचा आम्ही निष्कर्ष काढला असे इस्रोच्या एका वैज्ञानिकाने सांगितले.

दरम्यान विक्रमने चंद्रावर हार्ड लँडिंग केले असले तरी विक्रम लँडरचे काहीही नुकसान झालले नाही. हा संपूर्ण लँडर एकसंध असून त्याचे तुकडे झालेले नाहीत. फक्त हा लँडर एकाबाजूला झुकलेला आहे. चंद्राच्या कक्षेत फिरत असलेल्या ऑर्बिटरने पाठवलेला फोटो आणि अन्य डेटाच्या विश्लेषणावरुन ही माहिती समोर आली आहे.