पाकव्याप्त काश्मीरचे प्रमुख राजा फारुख हैदर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे भारतावर लष्करी हल्ला करण्याची मागणी केली आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील हवामान सांगण्यास सुरुवात केली असल्याने पाकिस्ताननेही आता दिल्लीच्या हवामान सांगण्यास सुरुवात करावी असही हैदर म्हणाले आहेत. यासंदर्भातील वृत्त ‘टाइम्स नाऊ’ने दिलं आहे.

भारत आणि पाकिस्तान सिमेजवळील गावांना हैदर यांनी मंगळवारी भेट दिली. करोनाच्या पार्श्वभूमीवर या भागातील आढावा घेण्यासाठी हैदर यांनी भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीनंतर बोलताना हैदर यांनी, “पंतप्रधान इम्रान खान यांनी आता ठोस निर्णय घेतले पाहिजेत. केवळ शाब्दिक प्रतिक्रियेने काहीही होणार नाही. इम्रान यांनी पुढे आलं पाहिजे आणि आपल्या लष्कराला भारतावर हल्ला करण्याचा आदेश दिला पाहिजे,” असं मत व्यक्त केलं. “या देशातील तुमच्या बंधू आणि भगिनींचे संरक्षण करणे हे तुमचे कर्तव्य आहे. भारत पाकव्याप्त काश्मीरचे हवामान सांगू लागला आहे तर आपण आपल्याकडे दिल्लीचे सांगण्यास सुरुवात करायला हवी,” असंही हैदर यावेळी म्हणाले.

काही दिवसांपूर्वीच भारताने पाकव्याप्त काश्मीरचा भाग असलेल्या मीरपूर, मुजफ्फराबाद आणि गिलगिट या भागाच्या हवामानाचा अंदाज सांगायला सुरुवात केली आहे. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर हैदर यांनी दिल्लीच्या हवामानाचा अंदाज सांगण्यास आपण सुरुवात केली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. यावेळी बोलताना हैदर यांनी भारतासंदर्भाती इम्रान खान सरकारीची धोरणे आणि दृष्टीकोन यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली. सध्याच्याच पद्धतीने पाकिस्तानने या विषयाकडे बघणे सुरु ठेवल्यास काश्मीरला स्वातंत्र्य मिळणार नाही. तसेच काश्मीर पुढील ७०० वर्षे पाकिस्तानचा भाग होऊ शकणार नाही, असा टोला त्यांनी इम्रान सरकारच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त करताना लगावला.

हैदर हे पाकिस्तानमधील वाचाळवीर नेत्यांपैकी एक आहे. हैदर नेहमीच जम्मू काश्मीर आणि भारताबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असतात. जम्मू काश्मीरमध्ये सशस्त्र लढा (घुसखोरी आणि दहशतवादी कारवाया) सुरु ठेवल्या पाहिजेत असं वादग्रस्त वक्तव्य हैदर यांनी काही महिन्यांपूर्वी केलं होतं.