देशात आतापर्यंत अनेक रुग्णालयांत आगी लागून रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटना झाल्यानंतर रुग्णालये व शुश्रूषा गृहांची अग्निसुरक्षा व्यवस्था तपासणी करण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत.

केंद्रीय गृह सचिव भल्ला यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अनेक रुग्णालये व शुश्रूषा गृहांमध्ये यापूर्वी आग लागून रुग्ण प्राणास मुकले आहेत. महाराष्ट्र व गुजरात या राज्यात अशा आगीच्या घटना सर्वाधिक झाल्या आहेत. आगीच्या या घटनांमुळे सदर रुग्णालयांमध्ये अंतर्गत वीज व अग्निसुरक्षा व्यवस्था नीट नसल्याचेच दिसून आले आहे. त्यामुळे सर्व रुग्णालये व शुश्रूषागृहे यांनी अग्निसुरक्षा व वीज सुरक्षा यंत्रणेची पाहणी करून घ्यावी. विशेष करून कोविड रुग्णालयांनी अशी तपासणी करून घेणे अपेक्षित आहे.

गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांनी अग्निसुरक्षा उपायांचा आराखडा तयार करून आरोग्य सुविधा निर्माण करण्यात याव्यात. विविध पातळीवरील अधिकाऱ्यांना याबाबत आदेश लागू करण्याच्या सूचनाही राज्य व केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत.