राजस्थानच्या उदयपूरमध्ये फतेह सागर तलावाच्या तीरावर असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस या पंचतारांकित हॉटेलची २००२ मध्ये कवडीमोल दराने विक्री करून भ्रष्टाचार केल्याबद्दल तत्कालीन निर्गुतवणूकमंत्री अरुण शौरी यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे, असे विशेष सीबीआय न्यायालयाने म्हटले आहे.

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये शौरी निर्गुतवणूकमंत्री होते, लक्ष्मी विलास पॅलेस या पंचतारांकित हॉटेलचे मूल्य २५२ कोटी रुपयांहून अधिक असताना त्याची केवळ ७.५ कोटी रुपयांना विक्री करण्यात आली त्याबाबत सीबीआय न्यायालयाने उपरोक्त मत नोंदविले आहे. शौरी यांच्यासमवेतच माजी नोकरशहा प्रदीप बैजल आणि हॉटेल व्यावसायिक ज्योत्स्ना सुरी यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हॉटेल विक्रीचे हे प्रकरण पुन्हा खुले करण्याची न्यायालयाची इच्छा आहे. अज्ञात अधिकारी आणि खासगी व्यक्ती यांचा १९९९ ते २००२ या कालावधीत या कारस्थानामध्ये सहभाग होता आणि त्यामुळे सरकारी तिजोरीला मोठा तोटा सहन करावा लागला, जमिनीचे मूल्य ४५ रुपये प्रति चौरस यार्ड इतके ठरविण्यात आले, या हॉटेलमधील एक चमचाही त्याहून अधिक रकमेचा असेल, असे विशेष सीबीआय न्यायाधीश म्हणाले. हॉटेल व्यावसायिक ललित सुरी यांना हे हॉटेल केवळ ७.५ कोटी रुपयांना विकण्यात आले.

दरम्यान, या आदेशाविरोधात आपण राजस्थान उच्च न्यायालयात फेरविचारयाचिका दाखल करणार असल्याचे शौरी यांनी सांगितले.