रेल्वे प्रवासादरम्यान आता प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. कारण रेल्वेतील खान-पानासाठी आता जास्त जीएसटी भरावा लागणार आहे. रेल्वे डब्यात प्रवासादरम्यान विकल्या जाणाऱ्या खाद्य-पेयांवर यापुढे १८ टक्के जीएसटी (वस्तू व सेवा कर) लावला जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्लीच्या अ‍ॅथॉरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंगने(एएआर) घेतला आहे. आतापर्यंत केंद्र सरकारकडून या खाद्य-पेयांवर सवलतीच्या दरात ५ टक्के जीएसटी लावण्यात येत होता.

मात्र, रेल्वे ही वाहतुकीचे साधन आहे, रेल्वेला कँटिन अथवा रेस्टॉरंट मानता येणार नाही. त्यामुळे अशा खाद्य-पेयांवर पूर्ण १८ टक्के जीएसटी लागेल. ही सेवा नाही, त्यामुळे ही विक्री/वस्तू पुरवठा जीएसटीच्या पूर्ण दरास पात्र आहे, असं अ‍ॅथॉरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंगने म्हटलं आहे.

यापूर्वी आऊटडोअर कॅटरिंगद्वारे पुरविल्या जाणा-या खाद्य-पेयांवर १८ टक्के व कँटिनमधील खाद्यपेयांवर ५ टक्के जीएसटी लावण्याची तरतूद होती. परंतु केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाने रेल्वेला पुरवठा होणा-या खाद्य-पेयांवरही सवलतीच्या ५ टक्के दरात जीएसटी लागेल, असे परिपत्रक काढले होते.

प्लॅटफॉर्मवरही भरावा लागणार जास्त जीएसटी-
प्लॅटफॉर्मवर विक्री होणा-या प्रत्येक पदार्थांवर वेगवेगळा जीएसटी दर लागेल असं एएआरने म्हटलं आहे. तसंच थंड किंवा गरम करुन सामानाच्या विक्रीवरही टॅक्समध्ये सूट मिळणार नाही. रेल्वेला जी कंपनी सामान पुरवेल त्यांनाही १८ टक्के जीएसटी द्यावा लागेल.