‘शोले’चा मूळ शेवट ठाकूरच्या हातून गब्बरसिंगचा शेवट होतो, असा आम्ही चित्रित केला होता, परंतु, सेन्सॉर बोर्डाच्या आग्रहामुळे आम्हाला तो बदलावा लागला. हा बदल ‘शोले’शी संबंधित असलेल्या  कुणालाही पसंत नव्हता, असे ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी सांगितले.
भारतीय सिनेमाच्या शताब्दीनिमित्त येथे आयोजित महोत्सवांतर्गत ‘चित्रपटातील िहसाचार आणि शिवीगाळ’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. निर्माता-दिग्दर्शक विशाल भारद्वाज हेही या चर्चासत्रात सहभागी झाले होते.
सिप्पी यांनी सांगितले की चित्रपटात िहसाचार दाखवताना दिग्दर्शकाने जबाबदारीचे भान ठेवायला हवे हे मान्य. परंतु, ‘शोले’चा शेवट ज्या पद्धतीने बदलावा लागला तो आमच्यासाठी समाधानकारक नव्हता. ठाकूर (संजीव कुमार) शेवटी गब्बरला (अमजदखान) जिवे न मारता पोलिसांच्या स्वाधीन करतो, हा शेवट अनेक प्रेक्षकांना आवडला नाही. परंतु हा शेवट आमच्या नव्हे, तर सेन्सॉर बोर्डाच्या कल्पनेतील होता. या चित्रपटाची पटकथा अशी होती, की गब्बरचा खातमा होणेच प्रेक्षकांना आवडले असते. परंतु शेवटच्या क्षणी पोलीस हजर होतात व खलनायकाला ताब्यात घेतात, हा वापरून गुळगुळीत झालेला फॉम्र्युला आम्हाला वापरावा लागला. ज्याबद्दल मला आजही खंत वाटते.
 सिप्पी म्हणाले की, चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असताना सेन्सॉर बोर्डाने ऐनवेळी अडवणूक करून शेवट बदलायला भाग पाडले. त्यासाठी क्लायमॅक्स पुन्हा चित्रित करावा लागला.  सेन्सॉरचे जरी समाधान झाले तरी दिग्दर्शक म्हणून हा शेवट मला कधीच आवडला नाही. एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे दाखवणे हे आमचे काम आहे. परंतु, एखाद्या चांगल्या कामात कसा खोडा घालता येईल हेच बहुदा सेन्सॉरचे काम  असावे. शेवटी आम्ही समाजाचे मनोरंजन करणारे आहोत, समाजाला शिक्षण देणे हे आमचे काम नाही.