मलेशियातून आलेल्या तबलीगी जमातीच्या आठ जणांना विमानतळावर अटक केली आहे. रविवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या आठ जणांनी रिलीफ फ्लाइटद्वारे पसार होण्याचा प्रयत्न केला होता. पर्यटक व्हिसा आधीच बंद केल्यामुळे या आठ जणांचे पितळ विमानतळावर उघडं पडले. आठही जणांना दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन केलं जाणार आहे. आठही जणांवर आता न्यायालयीन कारवाई होण्याची शक्यता आहे.

विमानतळावरील एका आधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मलेशियाचे आठ जण मालिंदो एयर रिलीफ फ्लाइटमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी पकडलेय. त्यांना पुढील कारवाईसाठी दिल्ली पोलिसांकडे सपूर्द करण्यात आले आहे. नियमांनुसार, आठही जणांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.

गेल्या महिन्यात दिल्लीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभुमीवर निजामुद्दीन येथे तबलीगी जमातीकडून एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भारतांसह जवळजवळ १६ देशातील नागरिकांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाला जवळजवळ २३०० लोकांनी उपस्थिती लावल्याचे समोर आले आहे. करोना व्हायरसमुळे दिल्ली सरकारने धार्मिक आणि अन्य कोणत्याही कार्यक्रमावर बंदी घातली होती. मात्र दिल्लीत तबलीगी जमातीकडून एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अधिक तपास करण्यात येत आहे. तसेच तबलीगी जमातीचे प्रमुख मौलानांसह अन्य जणांच्या विरोधात साथीच्या रोग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.