ज्येष्ठ कन्नड साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ मल्लेशप्पा कलबुर्गी (७७) यांची रविवारी पहाटे दोन अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून निर्घृण हत्या केली. धारवाडमध्ये घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने कर्नाटकातील साहित्य व शिक्षण वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
कलबुर्गी यांच्या निवासस्थानी रविवारी पहाटे दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. कलबुर्गी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हम्पी विद्यापीठाचे माजी कुलगुरू असलेले कलबुर्गी स्पष्टवक्ते म्हणून परिचित होते. कलबुर्गी यांना राज्य व केंद्राच्या साहित्य अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. कलबुर्गी यांनी हिंदू धर्मातील मूर्तिपूजेवर वेळोवेळी टीका केली होती. त्यामुळे ते टीकेचे धनी ठरले होते. तसेच ‘वचन’ या साहित्य संग्रहात कलबुर्गी यांनी लिंगायत समाजावर टीकाही केली होती. कर्नाटकात लिंगायत समाजाचे आर्थिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात वर्चस्व आहे. त्यामुळे लिंगायत समाजातूनही कलबुर्गी यांच्यावर प्रखर टीका झाली होती. कलबुर्गी यांनी मूर्तिपूजेला केलेल्या विरोधामुळे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांशी त्यांचे वैमनस्य निर्माण झाले होते. दरम्यान, कलबुर्गी हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी खास पथक स्थापन करण्यात आले असून हल्लेखोरांना लवकरच पकडले जाईल, असा विश्वास हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त रवींद्र प्रसाद यांनी व्यक्त केला आहे. या हत्येमागे व्यक्तिगत शत्रुत्व कारणीभूत होते की अन्य काही कारण आहे, हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल असेही प्रसाद यांनी सांगितले.
बजरंग दलावर संशय?
कलबुर्गी यांच्या हत्येच्या पाश्र्वभूमीवर संशयाची सुई बजरंग दलाकडे वळली आहे. कलबुर्गी यांना आम्ही मारले असून यापुढे विवेकवादी विचारवंत व टीकाकार के. एस. भगवान हे आमचे लक्ष्य असतील, असे ट्वीट बजरंग दलाचे सहनिमंत्रक भुवीत शेट्टी यांनी केले आहे.
२०१२ मध्येही पुरोगामी लेखकाची हत्या
२०१२ मध्येही कर्नाटकमधील मठाधीशांविरोधात लिखाण करणाऱ्या गुलबग्र्यातील पुरोगामी लेखक लिंगप्पा सत्यमपेठे यांची २५ जुलैला हत्या करण्यात आली होती.
कलबुर्गी आणि वाद..

डा व्या विचारसरणीचे एम. एम. कलबुर्गी यांनी १९८० मध्ये मार्ग-१ या आपल्या पुस्तकामध्ये कर्नाटकमधील प्रभावशाली लिंगायत समाजाचे संस्थापक बसवराज आणि त्याची आई व बहीण यांच्यावर संशोधनात्मक लिखाण केले होते. यावरून कर्नाटकमध्ये प्राबल्य असलेल्या लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्या होत्या. तसेच त्यांनी या समाजाचे चन्नबसव या आणखी एका प्रमुखावर लिखाण केले होते. यामुळे कलबुर्गी यांना कर्नाटक विद्यापीठातील ‘बसव अभ्यास’ या समितीवरून पायउतार व्हावे लागले. यानंतर कलबुर्गी यांनी यापुढे कधीही लिंगायत समाजावर संशोधन करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. कलबुर्गी यांनी २०१४ मध्ये वादग्रस्त लेखक यू. आर. अनंतमूर्ती यांच्या १८ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचा हवाला देत हिंदू देवतांबद्दल कर्नाटक अंधश्रद्धा विरोधी कायद्यावरील एका चर्चासत्रात त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. यावरून बराच वादंग निर्माण झाला होता. बजरंग दल व विहिंप यांसारख्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी याचा प्रखर विरोध केला होता. तसेच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांच्यावर बेंगळूरुमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

मल्लेशाप्पा मडीवाळप्पा कलबुर्गी
4जन्म – १९३८, यरगळ, विजापूर
4शिक्षण- एम. ए. (कन्नड)
4कार्य- हम्पी विद्यापीठाचे कुलगुरू, कर्नाटक विद्यापीठामध्ये प्राध्यापक. मार्ग-१ ते ४ चे लेखन
4पुरस्कार- राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरस्कार (२००६), कर्नाटक राज्य साहित्य अकादमी पुरस्कार, नृपतुंगा आणि पम्पा पुरस्कार, बसव पुरस्कार, यक्षगान पुरस्कार.