वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा मुलगा आणि अल-कायदाचा पुढील म्होरक्या हमजा बिन लादेन हा हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त अमेरिकेतील माध्यमांनी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे. मात्र हमजाच्या मृत्यूमागे अमेरिकेचा हात आहे की नाही ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हमजा लादेन ठार झाला असल्याची गोपनीय माहिती अमेरिकेला मिळाली असल्याचे वृत्त एनबीसी न्यूजने अमेरिकेतील तीन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे, मात्र या अधिकाऱ्यांची नावे कळू शकलेली नाहीत. हमजा ठार झाल्याचा पुरावा अमेरिकेला मिळाला असल्याचे एका अधिकाऱ्याने सीएनएनला सांगितले.

अमेरिकेतील दोन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने द न्यू यॉर्क टाइम्सने म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कारवाईत हमजा ठार झाला असून या कारवाईमध्ये अमेरिकेचाही सहभाग आहे. मात्र हमजा नक्की कोठे आणि कधी ठार झाला त्याची माहिती मिळालेली नाही.

याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना वार्ताहरांनी विचारले असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला नाही अथवा त्याचा इन्कारही केलेला नाही. यावर आपल्याला कोणतेही भाष्य करावयाचे नाही, असे ट्रम्प म्हणाले.

हमजाचा ठावठिकाणा सांगणाऱ्याला अमेरिकेने एक लाख डॉलरचे इमान जाहीर केले होते, मात्र त्यापूर्वीच हमजा ठार झाल्याचे सूचित करणारे वृत्त आहे. हमजा हा ओसामाच्या २० मुलांपैकी तिसऱ्या पत्नीचा १५ वा मुलगा असून तो ३० वर्षांचा आहे. ओसामा बिन लादेन याला ठार केल्यानंतर अल-कायदाची सूत्रे त्याच्याकडे होती.

ओसामाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हमजा अमेरिका आणि अन्य देशांवर हल्ले करण्याचे आदेश देत असतानाची एक दृक्श्राव्य फीत जारी करण्यात आली होती. अबोटाबादमध्ये हस्तगत केलेल्या दत्तावेजामधून हमजा हा दहशतवादी संघटनेचा पुढील म्होरक्या असल्याचे स्पष्ट झाले होते.

हमजा हा इराणमध्ये नजरकैदेत असल्याचे बोलले जात होते, त्याचप्रमाणे तो पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि सीरियामध्ये होता असेही वृत्त आहे.