ओसामा बिन लादेन…. पाकिस्तानमधील अॅबटाबादमधील घरात लपून बसलेल्या ओसामाचा अमेरिकेच्या नेव्हीसीलच्या कमांडोंनी खात्मा केला. कमांडोंनी घरात प्रवेश करण्यापूर्वी घरात नेमके काय वातावरण होते याचा उलगडा ओसामाच्याच पत्नीने केला आहे. ज्या प्रसंगावर चर्चा करणेही टाळायचो तो प्रसंग काही मिनिटांमध्ये आमच्यासमोर घडला आणि काही क्षणातच लादेन आमच्या डोळ्यादेखत मरण पावला असे ओसामाची पत्नी अमालने म्हटले आहे.

ओसामाची पत्नी अमाल बिन लादेनने ‘द एक्साईल: द फ्लाईट ऑफ ओसामा बिन लादेन’ या पुस्तकात ओसामा बिन लादेनच्या शेवटच्या काही क्षणांना उजाळा दिला आहे. पुस्तकाच्या लेखिकेने या पुस्तकासाठी अमालची मुलाखत घेतली होती. यात तिने त्या रात्री नेमके काय घडले हे सांगितले. अमाल म्हणते, रात्री आमच्या घराच्या आवारात हेलिकॉप्टर उतरल्याचे आमच्या लक्षात आले. हेलिकॉप्टरमधील ‘नेव्हीसील’चे कमांडो घराच्या दिशेने येत असताना आम्हाला शेवटचे क्षण आल्याची जाणीव झाली असे अमाल सांगते. ओसामाने त्याच्या सर्व बायकांना दुसऱ्या खोलीत जायला सांगितले. ‘अमेरिकेला मी हवा आहे, तुम्ही नाही, तुम्ही सर्वजण दुसऱ्या खोलीत जाऊन बसा’ असे ओसामाने सांगितले.

कुटुंबातील सर्व जण दुसऱ्या खोलीत गेले. पण  मी दुसरीकडे जाण्यास नकार दिला. कमांडोनी खोलीत प्रवेश केल्यावर मी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी माझ्या पायावर गोळी झाडल्याने मी जखमी झाले असे अमाल सांगते. माझा मुलगा हुसैन हादेखील त्या खोलीत होता. त्याच्या डोळ्यादेखत कमांडोजनी ओसामाला ठार मारले. मी जेव्हा डोळे उघडले त्यावेळी आम्ही सर्वजण बंगल्यातील खालच्या खोलीत होतो. आमच्यासमोर ओसामाचा मृतदेह होता आणि कमांडो आामच्याकडून हा ओसामाच आहे का याची खातरजमा करुन घेत होते असे अमालने सांगितले.

कमांडोंनी ओसामाचा मुलगा खलिदवर गोळीबार केला आणि ते आमच्या खोलीच्या दिशेने येत होते, त्यावेळी मला आमच्यापैकीच कोणीतरी दगा दिला आणि अमेरिकेला माहिती दिली याची जाणीव झाली होती असे अमालने सांगितले.