श्रीमंत असो वा गरीब. कांदा कुणाच्याही डोळ्यात पाणी आणू शकतो. त्यात आता कांद्याचे भाव गगनाला भिडल्याने भल्याभल्यांच्या स्वयंपाकघरातील आर्थिक गणित बिघडले आहे. अगदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नाडिस यांच्यादेखील! त्याशिवाय का तालकटोरा रस्त्यावर अवघ्या तीस रुपये किलो दराने ‘आम आदमी’चा कांदा घेण्यासाठी ऑस्कर फर्नाडिस रांगेत थांबले. तेदेखील प्लास्टिकची पिशवी घेऊन.
संसदेच्या गुरुद्वारा रकाबगंजच्या दिशेने उघडणाऱ्या प्रवेशद्वारासमोरचा रस्ता म्हणजे तालकटोरा रस्ता. सत्ता व संपत्तीची कमतरता नसलेला प्रभाग. तालकटोरा रस्त्याच्या नजीकच्या ८, पंडित पंत मार्गावर राहणाऱ्या ऑस्कर यांना ‘स्वस्त कांद्याची’ खबर मिळाली आणि ऑस्कर फर्नाडिस थेट पिशवी घेऊन पायी बाहेर पडले. ऑस्कर यांच्या मागे उभे होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समर्थक जगदीश इनामदार! त्यांनी ऑस्करजींना ओळखले. ऑस्कर फर्नाडिस यांनी चार किलो कांदे घेतले व पुन्हा पंत मार्गाच्या दिशेने चालू लागले. कधी काळी ‘गरिबी हटाव’ची घोषणा देणाऱ्या काँग्रेस पक्षाचे ऑस्कर फर्नाडिस हे बडे नेते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय. फर्नाडिस यांना कांद्याने भरदिवसा खरेदीसाठी रस्त्यावर आणले. दिल्लीत २८० ठिकाणी ३० रुपये किलो दराने कांदा विकण्याची व्यवस्था केजरीवाल सरकारने केली आहे. त्याचाच लाभ ऑस्कर फर्नाडिस घेत होते.