‘ब्लेड रनर’ म्हणून परिचित असलेला दक्षिण आफ्रिकेचा अपंग धावपटू ऑस्कर पिस्टोरियस याच्यावर शुक्रवारी खुनाचा आरोप ठेवण्यात आला. आपल्या गर्लफ्रेंडचा खून केल्याच्या कारणावरून पिस्टोरियसला गुरुवारी अटक करण्यात आली होती. त्याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
आपल्या हातून घडलेल्या कृत्यामुळे पिस्टोरियसला अपमानित झाल्यासारखे वाटते होते. न्यायाधीशांसमोरही तो मान खाली घालूनच उभा होता. त्याला लाजीरवाणे वाटत असल्याचे लक्षात आल्यावर न्यायाधीशांनी त्याला धीराने घेण्यास सांगितले आणि बसण्याची सूचना केली.
पिस्टोरियसची गर्लफ्रेंड रिवा स्टीनकॅम्प गुरुवारी पहाटे त्यांच्या घरात मृत अवस्थेत आढळली. तेथील एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार रिवाच्या डोक्यात, छातीमध्ये, ओटीपोटात आणि हातावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.
चोर समजून पिस्टोरियसने रिवावर गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती होती. मात्र, पोलिसांनी पिस्टोरियसच्या घराशेजारी राहणाऱयांना विचारल्यावर त्यांनी गोळ्यांचा आवाज येण्यापूर्वी त्याच्या घरातून मोठमोठ्यांदा बोलण्याचा आवाज येत असल्याचे सांगितले. त्यामुळे भांडणामुळे पिस्टोरियसने रिवावर गोळ्या झाडल्या का, याचा तपास पोलिस करताहेत.