सिनेभक्तांच्या चित्रपट कुतूहलाचा अंतिम टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्कर सोहळ्यावर अंतराळ थरार घडविणाऱ्या ‘ग्रॅव्हिटी’ या चित्रपटाने यंदा पुरस्कारांची बाजी मारली असली, तरी सर्वोत्तम चित्रपटाचा सन्मान गुलामगिरीची कहाणी मांडणाऱ्या ‘ट्वेल्व्ह इयर्स ए स्लेव्ह’ या चित्रपटाला मिळाला. रविवारी झालेल्या ८६ व्या ऑस्कर  सोहळ्यामध्ये ग्रॅव्हिटी आणि ट्वेल्व्ह  इयर्स ए स्लेव्ह या चित्रपटांमध्ये कोण वरचढ ठरणार याबाबतच्या चर्चाशर्यतींना पूर्णविराम मिळाला. सवरेत्कृष्ट अभिनयाची दोन्ही पारितोषिके डलास बायर्स क्लब या चित्रपटाला मिळाली. तर सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार केट ब्लँचेट हिला ब्लू जस्मीन या चित्रपटासाठी मिळाला. पटकथेचा पुरस्कार हर या चित्रपटासाठी स्पाईक जोन्ज यांना मिळाला, तर वेषभूषा, रचनेची पारितोषिके ग्रेट गॅट्सबे या चित्रपटांनी मिळविली. या पुरस्कार चित्रामुळे यंदा पुरस्कारांची गुणवत्तेनुसार विभागणी झाली. ग्रॅव्हिटीइतकीच १० नामांकने मिळविणाऱ्या अमेरिकन हसल या चित्रपटाला एकही पुरस्कार मिळाला नाही.
 गुणवत्तेमुळे सिनेपंडितांना अंदाज वर्तविण्यात सर्वात कठीण बनलेला यंदाचा ऑस्कर सोहळा कुणाही एका चित्रपटासाठी महत्त्वाचा ठरला नाही. ग्रॅव्हिटीला तांत्रिक गटातील बहुतांश पुरस्कारांव्यतिरिक्त केवळ दिग्दर्शनाचाच (अल्फान्सो क्वारोन) मोठा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाने एकूण सात पुरस्कार पटकावले. १२ इयर्स ए स्लेव्ह या चित्रपटाला सर्वोत्तम सहायक अभिनेत्री, सवरेत्कृष्ट रुपांतरित पटकथेसह मानाचा सवरेत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. कृष्णवंशीय दिग्दर्शकाने ऑस्कर पटकावण्याचा मान पहिल्यांदाच स्टीव्ह मॅकक्वीन यांना मिळाला आहे. परभाषिक चित्रपटावर इटलीच्या द ग्रेट ब्युटी या चित्रपटाने मोहोर उमटवली असून, अॅनिमेशनपट म्हणून फ्रोझन हा चित्रपट सवरेत्कृष्ट ठरला.

इतिहास विजयाचा ट्वेल्व्ह इयर्स ए स्लेव्ह या चित्रपटाला पुरस्कार मिळणे ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे आहे, कारण यापूर्वी कृष्णवंशीय दिग्दर्शकांमध्ये जॉन सिंगलटन यांना बॉयझ इन द हूड्स (१९९१) आणि ली डॅनियल्स यांना  प्रेशियस (२००९) या चित्रपटासाठी सवरेत्कृष्ट गटात नामांकन मिळाले होते.

हॉलीवूड चित्रपटांनी अमेरिकेच्या गुलामगिरीचा इतिहास अशाप्रकारे कधीच समाजापुढे मांडला नव्हता म्हणून हा सन्मान मिळाला.
स्टीव्ह मॅकक्वीन