राहुल गांधी यांचे आश्वासन

काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास अरुणाचल प्रदेश आणि ईशान्येकडील अन्य राज्यांना विशेष वर्गवारी दर्जा देईल, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.

संपर्कता, पायाभूत सुविधा आदी समस्या भेडसावत असल्याने देशातील काही राज्यांना विशेष वर्गवारी दर्जा देण्याची आवश्यकता आहे, असे राहुल गांधी यांनी येथे एका जाहीर सभेत सांगितले.

केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना अरुणाचल प्रदेश आणि ईशान्येकडील काही राज्यांना विशेष वर्गवारी दर्जा देण्यात आला होता. काँग्रेसच्या मनात अरुणाचल प्रदेशला विशेष स्थान आहे आणि राज्यातील जनतेशी दिल का रिश्ता ठेवण्यास आम्हाला आवडेल, असेही गांधी म्हणाले.

काँग्रेस नागरिकत्व (सुधारणा) विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ देणार नाही, कारण ते ईशान्येकडील जनतेसाठी हानीकारक आहे, ईशान्येकडील जनतेची दडपशाही होऊ दिली जाणार नाही. काँग्रेस पक्ष अरुणाचल प्रदेश आणि ईशान्येकडील अन्य राज्यांची भाषा, संस्कृती, परंपरा यावर कधीही हल्ला करणार नाही, असेही ते म्हणाले.

अरुणाचल प्रदेशमध्ये ११ एप्रिल रोजी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

चीनबाबत मोदी गप्प का?

इटानगर- काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित केला. चीनचे नेते क्षी जिनपिंग यांच्याशी चर्चेच्या वेळी मोदी यांनी प्रांतीय एकात्मतेचा मुद्दा उपस्थित केला नाही, असा आरोप गांधी यांनी केला.

काही वर्षांपूर्वी मोदी यांनी त्यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये क्षी जिनपिंग यांचे स्वागत केले होते तेव्हा मोदी यांनी सीमाप्रश्नाचा साधा उल्लेखही केला नाही, असा दावा गांधी यांनी केला. इतकेच नव्हे तर मोदी चीनला गेले असतानाही त्यांनी डोकलामचा मुद्दा उपस्थित केला नाही, असे गांधी येथे एका निवडणूक जाहीर सभेत म्हणाले.

देशाच्या प्रांतीय एकात्मतेचा प्रश्नही उपस्थित न करणारे मोदी या पार्श्वभूमीवर स्वत: देशभक्त असल्याचा दावा कसा करू शकतात, देशाला असे देशभक्त नको आहेत, अरुणाचल प्रदेशमधील जनता अधिक देशभक्त आहे, असेही ते म्हणाले.