एटीएमच्या माध्यमातून होणारे फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी आता बँकांनीही आवश्यक ती पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये एटीएमच्या माध्यमातून होणारे फसवणुकीचे प्रकार वाढले होते. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना याबाबत योग्य ती पावले उचलण्याचे आदेश दिले होते. आता कॅनरा बँकेने 10 हजार रूपयांपेक्षा अधिक रोकड एटीएमच्या माध्यमातून काढण्यासाठी पिन क्रमांकासहित मोबाइलवर आलेला ओटीपी टाकणंही बंधनकारक केलं आहे.

दरम्यान, लवकरच अन्य बँकाही कॅनरा बँकेसारखी पावलं उचलू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. “एटीएममधून फसवणुकीचे प्रकार हे रात्री 11 ते सकाळी 6 च्या दरम्यान अधिक होतात. रिझर्व्ह बँकेच्या सर्व आदेशांचे आम्हाला पालन करावे लागणार आहे. तसेच एटीएममधून होणारे फसवणुकीचे प्रकार थांबवावे असं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केल्याची माहिती,” स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

यापूर्वी एटीएममधील फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी दिल्ली स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीने (SLBC) काही उपाय सुचवले होते. त्यांनी एटीएमच्या दोन ट्रान्झॅक्शनदरम्यानचा कालावधी हा 6 ते 12 तासांचा असावा, असा पर्याय सुचवण्यात आला होता. 2018-19 मध्ये दिल्लीत एटीएममधून फसवणुकीची 179 प्रकरणे समोर आली होती. तर महाराष्ट्रातूनही 233 प्रकरणं समोर आली होती. काही महिन्यांपूर्वी एटीएम कार्डच्या क्लोनिंगचीही प्रकरणे समोर आली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी नागरिकांचा समावेश होता. गेल्या वर्षात देशभरात फसवणुकीच्या प्रकारत वाढ होऊन 980 प्रकरणे समोर आली होती. त्यापूर्वी एटीएमद्वारे फसवणुकीची 911 प्रकरणे उघड झाली होती.