आमची अर्थव्यवस्था ग्रेट आहे. आम्हाला काही अडचणी आहेत पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आऊटस्टँडिंग आहे, असे वक्तव्य देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी दावोस (स्वित्सर्लंड) येथे केले. दावोस येथे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या ४८ व्या वार्षिक परिषदेसाठी ते तिथे गेले आहेत. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी गौरवोद्गार काढले. त्याचबरोबर तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांनी दावोस परिषदेला गांभिर्याने घेतले नव्हते अशी टीकाही केली.

बजाज म्हणाले, आमची अर्थव्यवस्था ग्रेट आहे. काही अडचणी आहेत पण पंतप्रधान मोदी हे आऊटस्टँडिंग आहेत. एखाद्या व्यक्तीशी तुलना मला करायची नाही. आम्हाला अडचणी आहेत. पण आमच्या लोकसंख्येची सरासरी ही ३५ वयाच्या ही खाली आहे. जर आम्ही त्यांना शिक्षण आणि कौशल्य विकसित करण्याची संधी दिली तर देशाला त्याचा भरपूर फायदा होईल, असेही त्यांनी यावेळी म्हटले. तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा हे २१ वर्षांपूर्वी या परिषदेला आले होते. दुर्दैवाने ते आपल्या संपूर्ण कुटुंबासह येथे आले. कदाचित त्यामुळे त्यावेळी योग्य त्या गोष्टी घडल्या नाहीत. ही परिषद अत्यंत महत्वाची आहे. ही कुठली सहल नाही, असा टोलाही बजाज यांनी तत्कालीन सरकारला लगावला. असो.. पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे येत आहेत, याचा आम्हाला आनंद झाल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान मोदी हे दावोस येथील परिषदेसाठी रवाना झाले. ते उद्या (मंगळवार) परिषदेत भाषण करणार आहेत. देशात नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीसारख्या सुधारणा झाल्या. तसेच जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता निर्देशांकामध्ये भारताच्या मानांकनात वाढ होऊन प्रथमच पहिल्या १०० देशांमध्ये आपला क्रमांक लागला आहे. या पार्श्वभूमीवर देशात गुंतवणुकीसाठी आंतरराष्ट्रीय उद्योजकांना प्रोत्साहित करणे हेच मोदींच्या दावोसमधील सहभागाचे मुख्य सूत्र असेल.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दावोस परिषदेत सहभागी होण्यासाठी रविवारी पहाटे रवाना झाले. या परिषदेदरम्यान ते जागतिक पातळीवरील विविध उद्योग तसेच आर्थिक समूहांच्या प्रमुखांनी चर्चा करणार आहेत. विविध उद्योगांसाठी राज्यात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती देण्यासह राज्यातील विविध महत्वपूर्ण पायाभूत सुविधांबाबतच्या प्रस्तावित प्रकल्पांच्या उभारणीत त्यांचे सहकार्य घेण्याबाबतही प्रयत्न केले जातील. त्यासोबतच महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक वाढविण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे.