भारत आणि पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सरहद्दीवर तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होणारे हल्ले आता खपवून घेतले जाणार नाहीत. पाकने आपल्या कुरापती थांबवाव्यात नाहीतर परिणाम वाईट असतील, असा थेट इशारा केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांना पाकला गुरूवारी दिला आहे.
पाकिस्तानच्या कुरापती आता अधिक सहन केल्या जाणार नाहीत. सीमेवर होत असलेल्या हल्ल्यांना भारताकडून दुपट्टीने चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत अरुण जेटली म्हणाले. गोळीबारीची सुरुवात भारताकडूनच होत असल्यांच्या पाकिस्तानचा कांगावाही जेटली यांनी यावेळी खोडून काढला. भारत जबाबदारीने वागणारा देश असून अशाप्रकारचे भ्याड हल्ले करण्यात भारत विश्वास ठेवत नाही पण, देशातील नागरिक आणि सीमेची रक्षा करणे भारताची जबाबदारी आहे. ही जबाबदारी आम्ही वेळोवेळी योग्यरित्या बजावू, असेही ते पुढे म्हणाले. जोपर्यंत सीमेवर अशाप्रकराचे हल्ले पाकिस्तानकडून होत राहतील तोपर्यंत उभय देशांमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नसल्याचेही जेटली म्हणाले. पाकिस्तानने लवकरात लवकर आपल्या कुरापती थांबवाव्यात नाहीतर यापुढील परिणात त्यांना महागात पडतील अशी चेतावनी देखील जेटली यांनी यावेळी दिली.