सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) या मुद्यांवरून देशभरातील राजकीय वातावरण तापलेले आहे. विशेषकरून पश्चिम बंगाल, आसाम, दिल्ली व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये याचे जास्त पडसाद उमटताना दिसत आहे. अनेक ठिकाणी आंदोलना दरम्यान पोलिसांकडून कठोर कारवाई देखील करण्यात आली आहे. आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा देखील वापर करावा लागलेला आहे. सध्या देखील पश्चिम बंगालमध्ये या मुद्यावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र विरोधाची भूमिका घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांचे एक वादग्रस्त विधान समोर आलं आहे.

“दीदी (ममता बॅनर्जी) च्या पोलिसांनी त्या लोकांविरोधात काहीच कारवाई केली नाही, ज्यांनी सार्वजिक संपत्तीचं नुकसान केलं आहे. उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटकात आमच्या सरकारने अशा लोकांना कुत्र्यासारखे मारले आहे.” असं वादग्रस्त विधान दिलीप घोष यांनी केलं आहे.

तुम्ही इथं याल, आमचं अन्न खाल आणि इथं राहुन सार्वजनिक संपत्तीचं नुकसान कराल.. ही काय तुमची जहागीर आहे का? आम्ही तुम्हाला काठीने बडवू, गोळ्या घालू, तुरूंगात डांबू असं देखील घोष यांनी म्हटलेलं आहे.

केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो यांनी दिलीप घोष यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, दिलीप घोष यांनी जे काही म्हटले आहे त्याच्याशी भाजपाचा काही संबंध नाही. हा त्यांचा काल्पनिक विचार आहे. उत्तर प्रदेश आणि आसाममधील भाजपा सरकारने कधीच कोणत्याही कारणामुळे लोकांवर गोळीबार केलेला नाही. दिलीप घोष यांनी जे काही म्हटलेलं आहे ते अत्यंत बेजबाबदार असं वक्तव्य आहे.