अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने (नासा) भारताच्या चांद्रयान-२ या प्रकल्पातील चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळलेल्या विक्रम लँडरचा शोध घेतल्याचा दावा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) प्रमुखांनी फेटाळून लावला आहे. नासाच्या आधीच अनेक दिवसांपूर्वी इस्रोने चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळलेल्या विक्रम लँडरचे अवशेष शोधून काढल्याचे त्यांनी म्हटले आहे.

इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी माध्यमांना याबाबत माहिती देताना सांगितले की, “आपल्या ऑर्बिटरनेच विक्रम लँडरचा ठाव-ठिकाणा यापूर्वीच शोधून काढला आहे. याबाबत आम्ही याधीच आमच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे. तुम्ही वेबसाईटवर मागे जाऊन ते पाहू शकता.”

दरम्यान, चेन्नईमधील मेकॅनिकल इंजिनिअर आणि मोबाईल अॅप डेव्हलपर असलेल्या शानमुगा सुब्रमण्यम या तरुणाने नासाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागाच्या प्रसिद्ध केलेल्या फोटोंचे व्यवस्थित निरीक्षण करीत दुर्घटनाग्रस्त विक्रम लँडरचा ठावठिकाणा मिळवल्याचे काल विविध माध्यमांतून वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची माहिती या तरुणाने नासाला कळवल्यानंतर नासाने याची पडताळणी करीत काही वेळातच याला अधिकृतपणे दुजोरा दिला. तसेच याबद्दल शानमुगा सुब्रहमण्यम याचे आभार मानत कौतुकही केलं होतं.

चांद्रयान-२ मोहिम सुरु असताना १० सप्टेंबर रोजी चंद्राच्या अगदी जवळ पोहोचला असताना विक्रम लँडर दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यानंतर “चांद्रयान-२च्या ऑर्बिटरला विक्रम लँडर कुठे कोसळला आहे हे समजले आहे. मात्र, त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकत नसल्याचे,” ट्विट इस्रोने यापूर्वी केले होते.