चंडीगड : नद्यांमधील भारताच्या वाटय़ाचे पाणी यापुढे पाकिस्तानत जाऊ दिले जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरयाणातील चरखी दादरी मतदारसंघात निवडणूक प्रचारसभेत स्पष्ट केले. पाकिस्तानात वाहत जाणाऱ्या नद्यांमधील पाण्याचा प्रत्येक थेंब देशातील शेतकऱ्यांना दिला जाईल आणि त्या दृष्टिकोनातून कामाला सुरुवात झाली आहे, असेही मोदी म्हणाले.

नद्यांमधील ज्या पाण्यावर भारताचा हक्क आहे ते पाणी गेल्या ७० वर्षांपासून पाकिस्तानमध्ये वाहून जात आहे, यापुढे असे होणार नाही, हे प्रकार मोदी थांबविणार असून हे पाणी तुमच्या घरात येईल, असेही पंतप्रधान म्हणाले. हे पाणी हरयाणा आणि राजस्थानमधील शेतकऱ्यांचे आहे आणि भारत ते मिळविणारच, त्यासाठीचे काम सुरू झाले आहे, पाणी अडविण्यास आपण बांधील आहोत, तुमचा संघर्ष मोदी लढतील, असेही ते म्हणाले. अनुच्छेद ३७० च्या संदर्भाने मोदी म्हणाले की, काँग्रेसचे नेते जगभर अफवा पसरवत आहेत, मात्र त्यांनी आपल्याबद्दल अपशब्द वापरावे, परंतु देशाच्या पाठीत खंजीर खुपसू नये.

जिनिपग यांनी ‘दंगल’ पाहिला

चरखी दादरी (हरयाणा) : चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग भारत दौऱ्यावर आले असता त्यांनी आपण ‘दंगल’ हा चित्रपट पाहिल्याचे आपल्याला सांगितल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे सांगितले. चरखी दादरी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बबिता फोगट यांच्या प्रचारासाठी मोदी येथे आले असताना त्यांनी ही माहिती दिली. कन्यांमध्येही किती क्षमता असून शकते ते चित्रपट पाहताना कळले आणि आश्चर्यचकित झालो, असे जिनपिंग यांनी सांगितले. जिनिपग यांचे शब्द ऐकून आपल्याला हरयाणाबद्दल अभिमान वाटला, असे मोदी म्हणाले.