News Flash

नवाझ शरीफ, मुलगी व जावई यांच्याविरुद्ध पाकिस्तानी न्यायालयात आरोप निश्चित

लंडनमधील अ‍ॅव्हनफील्ड मालमत्तेशी संबंधित भ्रष्टाचाराचे प्रकरण

| October 20, 2017 01:38 am

पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ

लंडनमधील अ‍ॅव्हनफील्ड मालमत्तेशी संबंधित भ्रष्टाचाराचे प्रकरण

लंडनमधील अ‍ॅव्हनफील्ड मालमत्तेशी संबंधित भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात पाकिस्तानच्या भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने गुरुवारी देशाचे पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ, त्यांची मुलगी आणि जावई यांच्याविरुद्ध आरोप निश्चित केले.

६७ वर्षे वयाचे शरीफ, त्यांचे कुटुंबीय आणि अर्थमंत्री इशाक दार यांच्याविरुद्ध राष्ट्रीय उत्तदायित्व ब्यूरोने (नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो- एनएबी) भ्रष्टाचार व आर्थिक गैरव्यवहार यांची ३ प्रकरणे इस्लामाबदच्या अकाउंटेबिलिटी कोर्टात ८ सप्टेंबरला दाखल केली होती.

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नवाझ शरीफ यांन पनामा पेपर्स घोटाळ्यात २८ जुलैला अपात्र ठरवल्यानंतर काही आठवडय़ांतच ही प्रकरणे दाखल करण्यात आली होती.

नवाझ शरीफ आणि बचाव पक्षाचे मुख्य वकील ख्वाजा हॅरिस हे दोघे देशाबाहेर असतानाही अकाउंटेबिलिटी कोर्टाने लंडनमधील मालमत्तेच्या संदर्भात शरीफ, त्यांची मुलगी मरयम नवाझ व जावई कॅप्टन (निवृत्त) मोहम्मद सफदर यांच्यावर आरोप ठेवले. शरीफ हे त्यांची आजारी पत्नी कुलसुमसोबत लंडनमध्ये आहेत.

मरयम व सफदर हे आजच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर होते. तिन्ही आरोपींनी आपल्यावरील आरोप नाकारल्याचे न्यायालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

दार यांच्यावर यापूर्वीच आरोप ठेवण्यात आले असून त्यांच्याविरुद्धचा खटला सुरू झाला आहे. शरीफ व त्यांची दोन मुले हसन व हुसेन यांच्यावर इतर दोन प्रकरणांत नंतर आरोप ठेवले जाण्याची शक्यता आहे.

पत्नीच्या आजारपणामुळे शरीफ अनुपस्थित असल्याने, तसेच आकस्मिक कारणासाठी त्यांचे मुख्य वकील हॅरिस देशाबाहेर गेल्याने याप्रकरणी आज आरोपनिश्चिती करू नये, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला, मात्र न्यायाधीश मोहम्मद बशीर यांनी तो फेटाळला.

यानंतर, शरीफ यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या एका याचिकेवर निर्णय होईपर्यंत दोषारोपण लांबणीवर टाकले जावे, असा अर्ज शरीफ यांच्या कायदेशीर चमूने केला, पण तोही न्यायालयाने फेटाळला. शरीफ कुटुंबीयांविरुद्धची तिन्ही प्रकरणे एकाच प्रकरणात बदलावी, असा अर्ज या चमूने केला. त्यावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 1:38 am

Web Title: ousted pakistan pm nawaz sharif indicted over corruption claims
Next Stories
1 निर्मला सीतारामन यांनी अंदमान-निकोबार येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली
2 जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पीडीपी आमदाराच्या घरावर फेकले हातबॉम्ब
3 आग्रा एक्स्प्रेस वेवर हवाई दलाचं स्पेशल ड्रिल; पुढील आठवड्यात २० विमानं उतरणार
Just Now!
X