सुटकेनंतर जेएनयू’मधील सभेत कन्हैयाकुमारचा आरोप; अभाविपवरही जोरदार टीका

दिल्ली उच्च न्यायालयाने सहा महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैयाकुमार याने गुरुवारी देशद्रोहाच्या आरोपप्रकरणी जातमुचलका सादर केल्यानंतर त्याची तिहार कारागृहातून गुरुवारी सुटका करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा जेएययू संकुलातील सभेत त्याने भाजपवर टीका केली.

यावेळी मोठय़ा संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. आवेशपूर्ण भाषणात त्याने सरकारवर टीकास्त्र सोडले. कन्हैय्याच्या सुटकेवेळी कडेकोट बंदोस्त ठेवण्यात आला होता.  अभाविपवरही त्याने टीका केली. रोहित वेमुला याने सुरु केलेली लढाई आम्ही पुढे नेणार असल्याचा निर्धार  कन्हैय्याने व्यक्त केला. देशाची घटना व न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले. दरम्यान, जेएनयूचे सदस्य प्रा. एस. एन. मालकर यांनी कन्हैयाकुमारसाठी हमी दिली. कन्हैयाकुमार याच्यासमवेत अटक करण्यात आलेले अन्य दोन विद्यार्थी उमर खलिद आणि अनिर्बन भट्टाचार्य न्यायालयीन कोठडीत आहेत.

जेएनयूमध्ये जोरदार स्वागत

कन्हैयाकुमारची सायंकाळी साडे सहा वाजता सुटका झाली. मी देशविरोधी घोषणा दिली नसल्याचे सांगितले. त्यानंतर कन्हैय्या जेएनयूमध्ये गेल्यावर तेथे त्याची विद्यार्थी व प्राध्यापकांनी मिरवणूक काढली. जेएनयू संकुलात कन्हैयाने जोरदार भाषण केले त्याला विद्यार्थ्यांंनी प्रतिसाद दिला. जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यावर बोलणार नाही,मोदींचे सगळे वायदे म्हणजे निवडणुकीतील जुमले आहेत, अभाविपने जेएनयूमेधील पराभव आठवावा, शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण त्याचे उत्तर तुमच्याकडे आहे का, भाजपने कारस्थान करून आपल्याला कारागृहात टाकले, गरिबीपासून मुक्ती मगितली तर काय चुकले, असे कन्हैयाकुमार म्हणताच त्याला विद्यार्थ्यांंनी टाळ्या वाजवून दाद दिली.

‘आप’ सरकारच्या चौकशीतून निर्दोष

जेएनयू विद्यापीठ संकुलात आयोजित करण्यात आलेल्या वादग्रस्त कार्यक्रमात कन्हैयाकुमार देशविरोधी घोषणा देत असल्याचा कोणत्ही पुरावा दिल्ली सरकारने नियुक्त केलेल्या दंडाधिकाऱ्यांच्या चौकशीतून समोर आला नाही त्यामुळे कन्हैया निर्दोष असल्याचे म्हटले आहे. कन्हैयाकुमार देशविरोधी घोषणा देत असल्याचा आरोप करण्यात आल्याने पोलिसांनी त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला आहे.