नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मोठ्या जनादेशामुळे देश अस्थिरतेच्या आणि नैराश्याच्या वातावरणातून बाहेर आला असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्राला राष्ट्रपतींनी सेन्ट्रल हॉलमध्ये आपल्या अभिभाषणाद्वारे संबोधित केले. यावेळी राष्ट्रपतींनी सर्व मतदार, नवनिर्वाचित खासदार आणि लोकसभा अध्यक्षांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर ही निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महत्वाची भुमिका बजावणाऱ्या निवडणूक आयोग, प्रशासन आणि सुरक्षा दलांचेही त्यांनी अभिनंदन केले.

राष्ट्रपती म्हणाले, लोकसभा निवडणुकीत ६१ कोटी नागरिकांनी मतदान केले आणि नवा विक्रम प्रस्थापित केला. यामध्ये महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली होती, त्यांनी पुरुषांच्या तोडीने मतदान केले. तसेच नवमतदारांचाही या निवडणुकीत महत्वाचा वाटा राहिला. या १७व्या संसदेत जवळपास निम्मे खासदार हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. तसेच यावेळी ७८ महिला खासदार निवडून येणे ही भारताची नवी प्रतिमा दाखवते.

भारताच्या जनतेने स्पष्ट बहुमत दिलं त्यामुळे सरकार ‘सबका साथ, सबका विकास’ या विचाराने काम करीत आहे. पहिल्यांदा कोणत्याही सरकारने छोट्या दुकानदारांच्या आर्थिक सुरक्षेकडे लक्ष दिले आहे. कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत छोट्या दुकानदारांसाठी आणि रिटेल व्यावसायिकांसाठी एक वेगळी पेन्शन योजनेला आम्ही मंजुरी दिली. या योजनेचा लाभ देशातील सुमारे ३ कोटी छोट्या दुकानदारांना मिळेल, असा सरकारला विश्वास असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.

राष्ट्रपतींनी यावेळी आपल्या अभिभाषणात केंद्र सरकारने शेतकरी, जवान आणि गरीबांसाठी आणलेल्या नव्या योजनांचा उल्लेख केला. देशातील जल संकटाचा उल्लेख करीत राष्ट्रपती म्हणाले, येत्या काळात जलसंकट वाढू शकते. त्यावर मात करण्यासाठी जलशक्ती मंत्रालय स्थापन करण्याचे निर्णायक पाऊल उचलण्यात आले आहे. दुष्काळाच्या समस्येवरही केंद्र सरकार जागृत असल्याचे यावेळी राष्ट्रपती म्हणाले.

शेतकरी ग्रामीण अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत. ग्रामीण भारताच्या मजबूतीसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली आहे. येत्या काळात आणखी २५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारकडून २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी अनेक पावलं उचलण्यात आली असल्याचेही यावेळी राष्ट्रपती म्हणाले.

‘राष्ट्रीय संरक्षण निधी’द्वारे वीर जवानांच्या मुलांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्यांदाच राज्य पोलिसांच्या मुला-मुलींचाही समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुढील पिढीकरीता पाणी वाचवण्यासाठी नव्या जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या नव्या मंत्रालयाच्या माध्यमातून जल संरक्षण आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने जोडलेल्या व्यवस्थांना अधिक प्रभावी बनवण्यात येईल, असेही यावेळी राष्ट्रपतींनी केंद्र सरकारच्यावतीने आपल्या अभिभाषणात सांगितले.