जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानकडून वारंवार भारतविरोधी विधाने केली जात आहेत. यावरुन माजी परराष्ट्रमंत्री आणि काँग्रेस नेते शशी थरुर यांनी पाकिस्तानला सोमवारी चांगलेच खडे बोल सुनावले. ते म्हणाले, भारताविरोधात बोलणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी विरोधक सरकारसोबत आहेत. आम्ही पाकिस्तानला एक इंचही जागा देणार नाही.

थरुर म्हणाले, पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसखोरी केली आहे. त्यामुळे त्यांना आम्हाला बोट दाखवण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवालही त्यांनी केला. पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा युएनएचआरसीत मांडल्याबद्दल ते म्हणाले, भारताच्या अंतर्गत प्रकरणात पाकिस्तानला हस्तक्षेपाचा कोणताही अधिकार नाही. आम्ही विरोधी पक्षात आहोत त्यामुळे आम्ही सरकारवर टीका करु शकतो. मात्र, देशाबाहेर आम्ही एक आहोत, आम्ही पाकिस्तानला एक इंचही भूमी देणार नाही.

यावेळी शरुर यांनी एक संघटना म्हणून काँग्रेस पक्षाचे कौतुक केले. ते म्हणाले, मी काँग्रेसमध्ये यासाठी नाही आलो की, इथे माझे कायमचे करिअर होणार होते. तर, मी यासाठी काँग्रेसमध्ये आलो होतो की, काँग्रेस पक्ष हा सर्वसमावेशक आणि प्रगतीशील भारतासाठी सर्वाधिक चांगला मंच असल्याचे मला पटले होते. याच विचारांसाठी आम्ही लढा देणार आहोत केवळ जागा आणि मतांसाठी या विचारांचे बलिदान करु शकत नाही.