लखनऊ : उत्तर प्रदेशात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात झालेल्या हिंसाचारात बांगलादेश आणि काश्मीरमधील लोकांसह ‘बाहेरच्या’ लोकांचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे, असे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात कानपूरमध्ये शुक्रवार व शनिवारी झालेल्या निदर्शनांदरम्यान सुनियोजित पद्धतीने  हिंसाचार झाल्याचे पोलिसांच्या तपासात आढळले आहे, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आनंद देव तिवारी म्हणाले.

बांगलादेशी व काश्मिरींसह बाहेरच्या लोकांचा या हिंसाचारात सहभाग होता आणि तसे दर्शवणारा पुरेसा पुरावा आहे. हा सहभाग किती प्रमाणात होता, हा अद्याप तपासाचा मुद्दा आहे, असे तिवारी यांनी सांगितले.

बाहेरच्या लोकांना हुडकून काढण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. लखनौत गुरुवारी दंगलींसाठी प्रवृत्त करणारे हेच लोक होते काय हेही तपासून पाहिले जात आहे. गुप्त माहितीच्या आधारे कथित कारस्थान रचणारे व दंगेखोर यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशीही माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

यतीमखाना, रेल बाजार, बाबुपुरवा आणि फूलबाग यांच्यासह अनेक ठिकाणी एकाचवेळी ज्या पद्धतीने दंगे झाले, त्यावरून हे फार सखोल कारस्थान असल्याचे दिसून येते, असेही तिवारी म्हणाले.