देशातील विविध भागांमधील १०० हून अधिक पूल कोसळण्याच्या स्थितीत असून त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी संसदेत दिली.

लोकसभेत गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी देशातील पुलांच्या सद्यस्थितीविषयी माहिती दिली. केंद्र सरकारने गेल्या वर्षभरात देशभरातील १ लाख ६० हजार पुलांचे सेफ्टी ऑडीट केले. यामध्ये १०० हून अधिक पूल कोसळण्याच्या अवस्थेत असल्याचे समोर आले असे गडकरींनी सांगितले. धोकादायक अवस्थेतील हे १०० पूल कधीही कोसळतील अशा अवस्थेत असून त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे असे त्यांनी नमूद केले.

गेल्या वर्षी तब्बल ४२ जणांचे जीव घेणाऱ्या महाड पूल दुर्घटनेचाही गडकरींनी उल्लेख केला. २ ऑगस्ट २०१६ मध्ये महाड परिसरात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहून गेला होता. यात दोन एसटी बस आणि एक कार पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. महाडसारख्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी गेल्या वर्षीपासून सरकारने देशभरातील पुलांची माहिती गोळा करुन सेफ्टी ऑडीटचे काम हाती घेतले असे त्यांनी सांगितले.

रस्त्यांच्या कामात होणाऱ्या विलंबासाठी भूसंपादन, अतिक्रमण आणि पर्यावरण खात्याकडून परवानगी मिळवताना येणारे अडथळे कारणीभूत असल्याचे गडकरींनी लोकसभेत सांगितले. ३ लाख ८५ हजार कोटी रुपयांचे रस्ते प्रकल्प खोळंबले असून यातील बहुसंख्य प्रकल्पांमधील अडथळे दूर झाले आहेत. या रस्त्यांचे काम प्रगतीपथावर आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महाड दुर्घटनेला एक वर्षाचा कालावधी लोटला असला तरी पनवेल ते महाड या उपविभागातील १३ लहान आणि दोन मोठे ब्रिटिशकालीन पूल असून हे पूल अजूनही दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहेत.