नवी दिल्ली : देशातील अन्य अल्पसंख्याकांच्या मनात कधीही भीतीची किंवा असुरक्षिततेची भावना नसताना मुस्लिमांच्या मनात भीती असल्याची भावना अनाठायी आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते कृष्ण गोपाळ यांनी येथे बुधवारी व्यक्त केले.
वसुधैव कुटुंबकम आणि सर्वे सन्तु सुखिन: हे मंत्र म्हणजे भारतीय संस्कृतीचा पाया आहे. त्यांच्याशी आम्ही कधीही तडजोड केलेली नाही. इतकेच काय, पाकिस्तानचीही प्रगती व्हावी, हीच आमची प्रामाणिक भावना आहे. या देशात पार्शी, जैन आणि बौद्ध सलोख्याने नांदत आहेत. त्यांच्या मनात कधीही भीतीची भावना उद्भवलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
भारतात १६ कोटी मुस्लीम असल्याने त्यांनी घाबरू नये, असे मत इस्लामी तज्ञ रामिश सिद्दिकी यांनी मांडले आहे. त्याबाबत खेद व्यक्त करीत ते म्हणाले की, या देशात जेमतेम ५० हजार पार्शी आहेत, ४५ लाख जैन आणि ८० लाख बौद्ध आहेत. तरीही त्यांना भीती शिवत नाही. मग मुस्लिमांमध्ये जाणीवपूर्वक हा विचार रुजवला जाणे हे चुकीचे आहे.
मुघल युवराज दारा शिकोह समन्वय संस्कृतीचे प्रतीक, या विषयावर एका परिषदेत ते बोलत होते. उपनिषदांचे फार्सीमध्ये भाषांतर करणारे दारा हाऔरंगजेबाचा भाऊ होता. औरंगजेब हा दहशतवादाचे तर दारा शिकोह समन्वयशील संस्कृतीचे प्रतीक आहे, असे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 12, 2019 3:55 am