सेल्फी काढण्याची आवड कुणाला नसते? हल्ली ही एक फॅशनच झाली आहे. पण या सेल्फीने जगभरात एक दोन नाही २५० जणांचा बळी घेतला आहे. २०११ ते नोव्हेंबर २०१७ या वर्षांमध्ये एकूण २५० जणांनी त्यांचा जीव गमावला आहे. दरवर्षी साधारण ४३ जणांचा जीव गेला आहे. काही माणसे बुडून मेली आहेत तर काही माणसे उंच ठिकाणावरून पडून मेली आहेत. धोकादायक ठिकाणाहून सेल्फी काढणे लोकांच्या जीवावर बेतले आहे. सेल्फी घेताना अशा प्रकारे माणसे मरू नयेत म्हणून नो सेल्फी झोनही उभारण्यात येत आहेत.

२० ते २९ या वयोगटातील १० पुरुषांपैकी सात जणांचा मृत्यू सेल्फी घेताना झाल्याचे एका अहवालानुसार समोर आले आहे. डेलिमेलने या संदर्भातले वृत्त दिले आहे. भारतातील अनेक पर्यटन स्थळांवर सेल्फी घ्यायला बंदी घालण्यात आली आहे. पर्यटन स्थळी, धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे हे धोकादायक ठरू शकते. सेल्फी क्रेझ वाढत चालली आहे.. मुळात ती असणं गैर नाही मात्र सेल्फी काढताना अनेक माणसे निष्काळजीपणा करतात आणि त्यानंतर त्यांचा अपघाती जीव जाण्याच्या घटना घडतात असं इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्समधील लेखक डॉक्टर अगम बन्सल यांनी म्हटलं आहे.

भारताप्रमाणेच जगभरात अनेक ठिकाणी नो सेल्फी झोन उभारण्यात आले आहेत. मृतदेहाजवळ, पाण्याजवळ, पर्वत शिखरांवर सेल्फी घेण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच गगनचुंबी इमारतींवरही सेल्फी घेण्यास मज्जाव आहे. सेल्फीमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे हाच यामागचा एकमेव उद्देश आहे. ऑक्टोबर २०११ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत २५० जणांचा मृत्यू सेल्फी काढताना झाला आहे. या सेल्फीची क्रेझ असणाऱ्या लोकांसाठी तो त्यांचा शेवटचाच सेल्फी ठरला आहे असेच म्हणता येईल. तेव्हा चल बेटा सेल्फी ले ले रे म्हणण्या आधी सावधान!