जमावाला पांगवण्यासाठी गोळीबारात एक ठार

बांगलादेशात निदर्शकांनी हिंदूंची तीस घरे पेटवून दिली. एका हिंदू मुलाने आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकल्यानंतर काही अफवा पसरल्या होत्या त्यातून ही घटना झाल्याचे समजते. ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी गर्दी जमली असताना हवेत गोळीबार केला. त्यात एक जण ठार झाला. ढाक्यापासून ३०० कि.मी अंतरावर रंगपूर जिल्ह्य़ातील ठाकूरपारा येथे ही घटना घडली आहे.

पोलिसांच्या गोळीबारात पाच जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सुरुवातीला रबरी गोळ्यांचा मारा केला. नंतर अश्रुधुराची नळकांडी फोडली. निदर्शकांनी असा दावा केला की, ठाकुरबारी या खेडय़ातील मुलाने आक्षेपार्ह स्टेटस फेसबुकवर टाकले होते त्यामुळे जनमानसात संताप होता. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याच्या आधी तीस हिंदूंची घरे जमावाने जाळली व लुटालूट करीत मारहाण केली. आजूबाजूच्या सहासात खेडय़ांतील वीस हजार जणांचा जमाव एकत्र आला होता व त्यांनी नंतर हल्ला केला. निदर्शकांना आवरणे पोलिसांना कठीण होते. त्याचबरोबर कायदा व सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात सहा जणांना गोळीबारात जखमा झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यातील एकाचा मृत्यू झाला.

पोलिसांनी या प्रकरणी ३३ जणांना अटक केली आहे. रंगपूर-दिनाजपूर महामार्ग रोखण्यात आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. या भागात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता असे कोतवाली पोलिस स्टेशनचे अधिकारी मोकार्तुल इस्लाम यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाने तीन सदस्यांची चौकशी समिती अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अबू रझा महंमद रफीक यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केली असून त्यांना सात दिवसांत अहवाल दाखल करण्यास सांगण्यात आले होते.