दर तीन वैमानिकांमागे एका वैमानिकाचा विमान उड्डाणासाठी लागणारा परवाना हा बनावट असल्याची धक्कादायक बाब पाकिस्तानातून समोर आली आहे. संशयास्पद परवाने असलेल्या १५० वैमानिकांना विमानांचं उड्डाण करण्यापासून रोखण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये एक मोठा विमान अपघात झाला होता. त्याचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ८६० पैकी २६२ वैमानिकांचे परवाने बनावट असल्याची कबुली पीआयएच्या प्रवक्त्यांनीही दिली आहे.

“एवढ्या मोठ्या प्रमाणात वैमानिकांना विमानांचं उड्डाण करण्यापासून रोखल्यामुळे उड्डाणांवर परिणाम होणार आहे. बनावट पदवीधारक वैमानिकांची यापूर्वीच हकालपट्टी करण्यात आली आहे,” अशी माहिती पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या प्रवक्त्यांनी दिली. “ज्या वैमानिकांचे परवाने बनावट नसल्याचे सिद्ध होईल त्यांना पुन्हा कामावर रूजू करून घेतलं जाणार आहे,” अशी माहिती पाकिस्तानातील जिओ न्यूजनं पीआयएच्या प्रवक्त्यांच्या हवाल्यानं दिली आहे. ८६० पैकी २६२ वैमानिक असे आहेत ज्यांनी वैमानिक होण्यासाठी आवश्यक परीक्षाचं उत्तीर्ण केली नाही. याचाच अर्थ प्रत्येक तीन वैमानिकांपैकी १ वैमानिक हा बनावट आहे.

आपल्या जागी अन्य व्यक्ती पाठवला

खान यांनी कराची येथील विमान अपघाताचा अहवाल सादर केला. पीआयएमध्ये वैमानिकांची नियुक्ती राजकीय दबाव आणि त्यांच्या हस्तक्षेपाच्या आधारावर होत असल्याचा आरोप त्यांनी यावेली केला. “फेब्रुवारी २०१९ मध्ये ज्यावेळी तपास सुरू झाला तेव्हा २६२ जणांनी नोकरी मिळवण्यासाठी परीक्षेत आपल्या जागी अन्य कोणत्या व्यक्तीला पाठवल्याचं समोर आलं. त्यांच्या विमानांचं उड्डाण करण्याचाही अनुभव नव्हता. या क्षेत्रातही राजकीय हस्तक्षेप होतो,” असंही ते म्हणाले.

“आम्ही नागरी उड्डयन प्राधिकरणाला उर्वरित परवान्यांची यादी पाठविण्यास सांगितलं आहे. आम्हाला अहवाल मिळाला आहे आणि आम्ही आमचा स्तर अधिक उंचावण्याचा प्रयत्न करत आहोत. पीआयएच्या अध्यक्षांनी नागरी उड्डयन प्राधिकरणाला एक पत्र लिहून संशयास्पद आणि बनावट परवान्यांसह उर्वरित वैमानिकांचा तपशील मागवला आहे,” असंही प्रवक्त्यांनी सांगितलं. बनावट परवाने असलेल्या सर्व वैमानिकांवर कारवाई केली जाईल. व्यावसायिक कामकाज सुरक्षित करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील असं अध्यक्षांनी म्हटल्याची माहितीही पीआयएच्या प्रवक्त्यांनी दिली.