जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या आता 67 हजारांच्याही पुढे गेली आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृह व आरोग्य मंत्रालयाची एक बैठक पार पडली. यावेळी  केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी स्थलांतरित मजुरांच्या संदर्भात माहिती दिली.

टाळेबंदीच्या काळात विविध भागांत अडकून पडलेल्या सुमारे पाच लाख स्थलांतरित मजुरांना सरकारकडून सोडण्यात आलेल्या 468 विशेष रेल्वेंद्वारे त्यांच्या राज्यांमध्ये पोहचण्यात आले आहे. या अंतर्गत काल (रविवार) 101 विशेष रेल्वे सोडण्यात आल्या होत्या. तसेच, वंदे भारत मशीन अंतर्गत जवळपास चार हजार भारतीयांना 23 विशेष विमानांद्वारे परत आणले असल्याचेही पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितले आहे.

देशभरातील करोनाबाधितांची रुग्ण संख्या आता 67 हजार 152  वर पोहचली आहे. ज्यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 44 हजार 029 रुग्ण, उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले 20 हजार 916 जण व एकजण स्थलांतरित आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या 2 हजार 109 जणांचा समावेश आहे. रविवारपर्यंत देशभरात करोनामुळे 2 हजार 206 जणांचा बळी गेलेला आहे.

दरम्यान मागील चोवीस तासात देशभरात 1559रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत देशभरात 20 हजार 917 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 44 हजार 29 जणांवर उपचार सुरु आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. भारतातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 31.15 टक्क्यांवर पोहचलं आहे .