मुस्लिमांमधील तोडी तलाक देण्याची पद्धत तातडीने रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय मुस्लिम महिला आंदोलन संघटनेने केलेल्या याचिकेवर आतापर्यंत ५० हजार मुस्लिमांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामध्ये मुस्लिम समाजातील महिलांसोबतच अनेक पुरुषही आहेत. तोडी तीनवेळा तलाक शब्द उच्चारून पत्नीला तलाक देण्याची मुस्लिमांमधील पद्धत अमानवी असून, ती कुराणातील तत्त्वांच्याही विरोधात आहे, असे या संघटनेने म्हटले आहे.
भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाने तोंडी तलाक पद्धत बंद करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाद मागितली आहे. या पद्धतीमुळे अनेक मुस्लिम महिलांचे संपूर्ण आयुष्य उदध्वस्त होते. त्यामुळे ती बंद करावी, अशी मागणी आम्ही केली आहे. याच याचिकेवर आम्हाला देशभरातून ५० हजार महिला आणि पुरुषांनी स्वाक्षऱ्या दिल्या आहेत आणि आमच्या मागणीला पाठिंबा दिला आहे, असे संघटनेच्या पत्रात म्हटले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ललिता कुमारमंगलम यांना हे पत्र पाठविण्यात आले.
तोंडी तलाक देण्याच्या पद्धतीवर कायदेशीर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.