जून महिन्यात उत्तराखंडमध्ये आलेला पूर, भूस्खलन आणि ढगफुटीच्या घटनांमुळे सहा हजार लोक दगावल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या घटनांमध्ये ५८० लोकांचा बळी गेला तर ५ हजार ४७४ लोक बेपत्ता असून ते दगावले असावेत असे संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी लोकसभेत निवेदनाद्वारे स्पष्ट केले.
या घटनांमध्ये पायाभूत सुविधांची मोठी हानी झाली आहे. आपत्तीच्या वेळी तातडीने एक लाखावर लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आल्याचे अँटनी यांनी स्पष्ट केले. या आपत्तीच्या काळात केंद्र सरकार, लष्कर आणि निमलष्करी दलाने बचावकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. हवाई दलाने २३ हजार ७७५ लोकांची सुटका केली. तर लष्कराने ३८ हजार ७५० लोकांना सोडवले. इंडो-तिबेट सीमा पोलिसांनी ३३ हजार लोकांची सुटका केली. या भागात पुनर्बाधणीचे काम गतीने व्हावे यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची समिती स्थापन करण्यात आली आहे. याखेरीज एका मंत्रिपदाची स्थापना करण्यात आली आहे. अँटनी निवेदन वाचत असताना भाजप, समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. केंद्र सरकारचा निधी पोहोचला नसल्याचा आरोप भाजपने केला. तर या प्रकरणी चर्चेची मागणी समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसने केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 6, 2013 5:39 am