श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात सोमवारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात केवळ ८.३ टक्के मतदानाची नोंद झाली, मात्र कारगिलमध्ये सर्वाधिक म्हणजे ७८ टक्के मतदानाची नोंद झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

खोऱ्यातील ८४ हजार ६९२ पात्र मतदारांपैकी केवळ ७०५७ मतदार मतदानासाठी बाहेर पडले. मात्र एकूण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक चार टप्प्यांत घेण्यात येणार आहे.

कारगिल आणि लेहमध्ये मोठय़ा प्रमाणावर मतदानाची नोंद झाली. कारगिलमध्ये ७८ टक्के, तर लेहमध्ये ५२ टक्के मतदान झाले. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथे ३६.६ टक्के, तर हंडवारा येथे २७.८ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. श्रीनगरमधील तीन वॉर्डातील एकूण ३० हजार ७४ मतदारांपैकी केवळ १८६२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

बडगाम येथे १७ टक्के, तर अनंतनाग येथे ७.३ टक्के मतदानाची नोंद झाली. बारामुल्ला येथे ५.७ टक्के, तर बांदिपोरा येथे सर्वात कमी म्हणजे ३.३ टक्के मतदान झाले. सोमवारी केवळ ८३ विभागांमध्ये मतदान घेण्यात आले, कारण ६९ जण बिनविरोध निवडून आले आहेत. काश्मीर विभागातील १५० मतदान केंद्रांपैकी १३८ मतदान केंद्रे अतिसंवेदनक्षम जाहीर करण्यात आली होती. खोऱ्यातील निवडणुकीचा पहिला टप्पा शांततेत पार पडला, केवळ बांदिपोरा येथे दगडफेकीचे किरकोळ प्रकार घडले. दहशतवाद्यांनी या निवडणुकीत सहभागी होणाऱ्यांसाठी इशारा दिला होता, त्यामुळे उमेदवारांनी प्रचार केला नाही. अनेक विभागांमध्ये विशेषत: दक्षिण काश्मीरमध्ये निवडणुकीसाठी एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज सादर केला नाही.

बहिष्काराचा विशेष परिणाम नाही

जम्मू : नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीसह अनेक राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला असला तरी जम्मू आणि लडाख प्रदेशांत त्याचा परिणाम मतदारांवर झाला नाही, सोमवारी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदार मोठय़ा प्रमाणावर बाहेर पडले होते.जम्मू, पूंछ, राजौरी जिल्हे त्याचप्रमाणे लडाखमधील लेह आणि कारगिल येथे मतदारांच्या लांबलचक रांगा लागलेल्या दिसत होत्या. राज्यभरात निवडणुका सुरळीत पार पडाव्या यासाठी पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निवडणुकीशी संबंधित हिंसाचाराचे वृत्त कोणत्याही परिसरातून आले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

काश्मीरमध्ये तीन वर्षांत १२ पोलीस दहशतवादी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पोलीस नोकरी सोडून दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होण्याच्या घटना वाढत चालल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांत १२ पोलीस ३० शस्त्रांसह पसार झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत जम्मू-काश्मीर पोलिसांनी अशा प्रकारच्या घटनांसदर्भात एक विभागाअंतर्गत अहवाल तयार केला आहे.

पोलीस अधिकारी आदिल बशीर हा वाची विधानसभा मतदारसंघाचे आमदार एजाज मीर यांच्या निवासस्थानामधून आठ शस्त्रे घेऊन अलीकडेच फरार झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, १२ पोलीस अशा प्रकारे ३० शस्त्रे घेऊन पसार झाले आहेत.