काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहिम उघडली आहे. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत सुरक्षा दलांनी ९४ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

दक्षिण काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यातील तुर्कवागन गावामध्ये सुरक्षा दलांनी आज सकाळी तीन दहशतवाद्यांचा एन्काऊंटरमध्ये खात्मा केला. त्यानंतर विजय कुमार यांनी ही माहिती दिली. “उत्तर काश्मीरमवर आता आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत” असे कुमार यांनी सांगितले.

काश्मीर खोऱ्यात राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी मोठी मोहीम उघडली आहे. मंगळवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यात झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. पोलिसांनी ही माहिती दिली.

शोपियनच्या तुर्कवानगाम भागात ४४ राष्ट्रीय रायफल्स आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटे पाचच्या सुमारास चकमक सुरु झाली. जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून तुर्कवानगाम ६० किलोमीटर अंतरावर आहे. स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि सीआरपीएफची १७८ बटालियनही या कारवाईमध्ये नंतर सहभागी झाली होती.