पिण्याचं पाणी भरण्यावरुन दोन महिलांमध्ये झालेल्या वादावादीचे पर्यावसन हाणामारीत झाले. ज्यात एक महिलेला आपले दोन कान गमवावे लागले. कोलार जिल्ह्यातील बांगरपेठमध्ये ही घटना घडली. सार्वजनिक नळावर पाणी भरण्यावरुन हा वाद झाला. हल्ल्यात जखमी झालेली महिला इंद्रानी (४०) कादारीगाना कोप्पा येथे राहते. यशोदाम्मा, शशी, बसवराजाप्पा, संतोष आणि होसारायाप्पा या पाच जणांवर इंद्रानीवर (४०) हल्ला केल्याचा आरोप आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
नऊ मे रोजी गोठयातून परतत असताना पाच जणांनी आपल्याला रस्त्यात पकडले व धारदार ब्लेडने दोन्ही कान कापले असे इंद्रानीने सांगितले. सात मे रोजी सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी आपण गेलो असताना या वादाला सुरुवात झाली. यशोदाम्मा सुद्धा त्यावेळी तिथे पाणी भरत होती. गावच्या नियमानुसार प्रत्येकजण चार भांडी पाणी भरु शकतो.
पण यशोदाम्माने आधीच आठ भांडी पाणी भरले होते आणि तरीही ती पाणी भरण्यासाठी नळाखाली भांडी ठेवत होती असे इंद्रानीने सांगितले. जेव्हा पाणी भरण्यासाठी मी माझे भांडे ठेवले तेव्हा यशोदाम्माने ते भांडे फेकून दिले. त्यावरुन वादाला सुरुवात झाली. दोघींमध्ये तिथेच हाणामारी झाली.
गावकऱ्यांनी या वादामध्ये हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. नऊ मे ला इंद्रायणी गोठयामधून परतत असताना आरोपींनी तिला पकडले व तिचे दोन्ही कान कापले. माझे व्हिव्हळणे ऐकून माझा नवरा रघुपती मदतीसाठी धावून आला. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार झाल्यानंतर इंद्रानीला एसएनआर रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी इंद्रानीच्या कानावर शस्त्रक्रिया केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 16, 2019 7:15 pm