X

रात्री प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर

प्रवासाचा वेळ वाचणार

रेल्वे प्रवास हा सर्वात सुखकर प्रवास असल्याने देशात सर्वाधिक प्रवाशांकडून या माध्यमाचा वापर केला जातो. रात्रीच्या वेळी प्रवास करताना तर रेल्वे सर्वात जास्त सोयीची असते. रात्री चालणाऱ्या रेल्वेंचा वेग वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे तुम्ही रात्रीचा प्रवास करत असाल तर तुमचा हा प्रवास कमी वेळात पूर्ण होणार आहे. त्यासाठी वेगळा हायस्पीड कॉरीडॉर तयार करण्याची तयारी सुरु आहे. या मार्गावर २०० ते २५० किलोमीटर ताशी वेगाने रेल्वे धावतील. रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी या कॉरीडॉर्सच्या निर्मितीसाठी काम करण्याचे आदेशही नुकतेच दिले आहेत.

हा हायस्पीड मार्ग लवकरात लवकर पूर्ण करायचा असल्याने त्याचे काम वेगाने होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील १० हजार किलोमीटरचा टप्पा एप्रिल २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या मुंबई-पुणे या मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसला हा पल्ला पार करण्यासाठी ३ तासांचा कालावधी लागतो. मात्र ही वेळ कमी करुन ती एक ते दीड तासाने कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन हायस्पीड कॉरीडॉर झाल्यास रोज पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय अतिशय उपयुक्त ठरेल.

तसेच सध्या रेल्वेच्या विविध प्रकल्पांवर करण्यात येणारा खर्चही येत्या काळात कमी करण्यात येईल असे पियूष गोयल म्हणाले. त्यामुळे रेल्वेचा निधी वाचविण्याचा प्रयत्न येत्या काळात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या प्रकल्पातीलही अनेक गोष्टी कमीत कमी खर्चात करण्यात येणार आहे. यासाठी कोणतीही नवीन जागा घेण्यात येणार नसून सध्या रेल्वेकडे असलेल्या जागेतच हा प्रकल्प केला जाणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

 

First Published on: February 13, 2018 5:38 pm