मजलिस ए इत्तिहादिल मुसलीमीन पक्षाचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असाउद्दिन ओवेसी यांना २००५ मधील एका प्रकरणात सोमवारी २ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली. त्यांचे भाऊ व आमदार अकबरुद्दिन ओवेसी हे हिंदूविरोधी भाषणबाजीवरून सध्या तुरुंगात आहेतच.
मेडकचे जिल्हाधिकारी ए. के. सिंघल यांच्या कामकाजात अडथळा आणल्यावरून आठ वर्षांपूर्वी असाउद्दिन यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरन्ट बजाविण्यात आले होते. ते वॉरन्ट आता रद्द करावे, या मागणीसाठी त्यांनी न्यायालयात केलेली याचिका मेडक जिल्ह्य़ातील संगारेड्डी न्यायालयाने फेटाळली आणि त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
हैदराबाद-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी पतनचेरूजवळील मुत्तंगी गावातील एक मशिद जिल्हा प्रशासनाने पाडली होती. त्यावेळी ओवेसी तसेच त्यांचे सध्या तुरुंगात असलेले भाऊ अकबरुद्दिन तसेच अन्य काहीजणांनी जिल्हाधिकाऱ्यांना धमकावित वाद घातला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सोमवारी न्यायालयात ते वॉरन्ट मागे घेण्यासाठी पक्षाच्या काही नेत्यांनी याचिका दाखल केली. मात्र ओवेसी बंधूंपैकी कुणीही न फिरकल्याने न्यायालयाने ती फेटाळली.