ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल (एआयएमआयएम) पक्षाचं अधिकृत ट्विटर खातं हॅक झालं आहे. हॅकर्सने पक्षाच्या नावाऐवजी एलन मस्क यांचं नाव लिहीलं आहे. त्याचबरोबर डीपीवर एलन मस्क यांचा फोटो लावला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. एलन मस्क जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. तसेच स्पेक्सएक्स आणि टेस्लासारख्या कंपनीचे मालक आहेत. हे खातं कुणी हॅक केलं आणि का केलं? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

ओवैसी यांच्या पक्षाने नुकतंच उत्तर प्रदेशात १०० जागा लढवण्याची घोषणा केली आहे. यासाठी पक्षाने सुहेलदेव भारतीय समाज पार्टीसोबत युती केली आहे. त्याचबरोबर छोट्या पक्षांना सोबत घेण्यासाठी रणनिती आखली जात आहे. यानंतर ओवैसी विरोधकांच्या रडारवर आले आहेत. दुसरीकडे योगी आदित्यनाथ यांना २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री बनू देणार नाही, असं ओवैसी यांनी सांगितलं आहे. त्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. “ओवैसी मोठे नेते आहेत. देशात प्रचार करतात. त्यांना एका समुदायाचा विशेष पाठिंबा आहे. मात्र उत्तर प्रदेशात चॅलेंज नाही करू शकत. भाजपा आपले मुद्दे, मूल्यांसह मैदानात उतरणार आहे. मी चॅलेंज स्वीकारतो”, असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.

राजस्थान: ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा स्फोट; दुर्घटनेत पत्नीचा मृत्यू, पती गंभीररित्या जखमी

ओवैसींचा योगींवर हल्ला बोल…

काही दिवसांपूर्वीच ओवैसी यांनी उत्तर प्रदेशमध्ये लागू करण्यात आलेल्या उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरण २०२१-२०३० टीका केली होती. “डिसेंबर २०२०मध्ये केंद्रातील मोदी सरकारने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं की जन्मदर (Total Fertility Rate) घटू लागल्यामुळे देशात दोन अपत्य धोरण राबवता येणार नाही. पण दुसरीकडे आता योगी सरकार मात्र त्यालाच विरोध करत आहे. हा प्रस्ताव मांडून योगी सरकार मोदी सरकारच्या विरोधात जाणार का?”, असा प्रश्न ओवैसींनी उपस्थित केला होता. प्रस्तावित विधेयक घटनाविरोधी असल्याचंही यावेळी म्हटलं. “योगी सरकारने मांडलेलं लोकसंख्या नियंत्रण विधेयक हे राज्यघटनेच्या कलम २१ चं उल्लंघन ठरेल. शिवाय, हे विधेयक महिलांसाठी त्रासदायक ठरेल. कारण भारतात गर्भधारणा टाळण्यासाठी ९३ टक्के महिलांचे ऑपरेशन होतात. गर्भधारणा व्हावी की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार महिलांनाच दिला गेला पाहिजे”, असं ते म्हणाले होते.