भाजपची टीका;  अटकेतील आयसिसच्या समर्थकांना कायदेशीर मदतीच्या विधानावरून गदारोळ

हैदराबादमध्ये आयसिसशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक केलेल्यांना कायदेशीर मदत करण्याची घोषणा एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. त्यावर भाजपने टीका केली आहे. ओवेसी देशाचा विश्वासघात करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला आहे.

दहशतवाद्यांना पाठिंबा देऊन ओवेसी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आयसिसला मदत करत असल्याचा आरोप नक्वी यांनी केला आहे. एका बाजूला तुम्ही आयसिसचा निषेध करता तर दुसऱ्या बाजूला त्या सहानुभूतीदारांना मदत करता, हा दुटप्पीपणा आहे. तपास संस्थांनी याबाबत कायद्याच्या चौकटीत कारवाई करावी. तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे दहशतवाद्यांना मदत करतात त्यांचा निषेधच व्हायला हवा असे भाजपचे चिटणीस श्रीकांत शर्मा यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय तपास संस्थेने हैदराबादच्या पाच जणांना आयसिसशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. ओवेसींनी त्यांचा पक्ष दहशतवादाला पाठिंबा देणार नाही हे जाहीर करतानाच या पाच जणांना कायदेशीर मदत देण्याची घोषणा केली आहे. इतक्या खालच्या पातळीचे राजकारण त्यांनी करू नये असे नक्वी यांनी ओवेसींना सुनावले. ओवेसींविरुद्ध याचिका

मीरत: ओवेसी यांनी काढलेल्या उद्गारांमुळे देशद्रोह झाला असून दहशतवादाला प्रोत्साहन मिळाले आहे, असा आरोप करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका उत्तर प्रदेश बार कौन्सिलचे सदस्य अनिलकुमार बक्षी यांनी  स्थानिक न्यायालयात दाखल केली आहे.

गुन्ह्य़ाला प्रोत्साहन देणे, भारत सरकारविरुद्ध बंड पुकारणे, बंडाला पाठिंबा देणे, दोन गटांमध्ये शत्रुत्व पसरवणे, इ. आरोपांसाठी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार ओवेसी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार बक्षी यांनी  न्यायालयात शनिवारी दाखल केली आहे.

ओवेसींच्या अटकेची मागणी

ओवेसी यांना तातडीने अटक करावी अशी मागणी तेलंगणमधील भाजप आमदार टी.राजा सिंह यांनी केली आहे. तेलंगणमधील सत्तारूढ टीआरएसने एमआयएमला पाठिंबा दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केंद्राने एमआयएमची मान्यता रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली.संयुक्त जनता दलाने ओवेसी यांना अटक करावी अशी मागणी केली आहे.