एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकताच अयोध्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली होती. ही प्रतिक्रिया धार्मिक भावना दुखावणारी असल्याचा दावा भोपाळचे वकील अॅड. पवनकुमार यादव यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. भोपाळच्या जहांगिरबाद पोलीस ठाण्यात ओवेसींवर या संदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

देशद्रोह आणि धार्मिक भावना दुखावल्याचे एफआयआरमधील तक्रारीत म्हटले आहे. अयोध्या प्रकरणावरील निकालानंतर ओवेसींनी केलेल्या विधानाचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे. ९ नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने रामलल्लाच्या बाजूने निकाल दिला होता. तसेच केंद्राला आदेश दिला होता की राम मंदिराच्या उभारणीसाठी तीन महिन्यांत ट्रस्टची स्थापना करण्यात यावी आणि मशीद बांधण्यासाठी पाच एकर जागा देण्यात यावी. टाइम्स नाऊ न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले होते, ज्यांनी ६ डिसेंबर २०१९ रोजी बाबरी मशीद पाडली त्यांनाच सुप्रीम कोर्टाने आज ट्रस्ट स्थापन करायला सांगून मंदिराच्या उभारणीचे आदेश दिले आहेत. मात्र, मुस्लिम आपल्या कायदेशीर अधिकाऱांसाठी लढा देतील ५ एकर जमीनीसाठी भीक मागणार नाहीत.

“आमचा संविधानावर पूर्णपणे विश्वास आहे, आम्ही आमच्या कायदेशीर हक्कांसाठी लढा दिला आहे. आम्हाला पाच एकर जमीनीचे दान नको. आम्हाला ही पाच एकरची जमीन नाकारायला हवी. जर आम्ही हैदराबादच्या रस्त्यांवर भीक मागितली तरी आमच्याकडे उत्तर प्रदेशात मशीद बांधण्यासाठी पुरेसे पैसे जमा होतील. मुस्लीमांना इतरत्र मशीद बांधण्यासाठी पाच एकर जमीन देण्याची बाब म्हणजे मुस्लिमांच्या श्रद्धेचा अपमान आहे.” असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले होते.