जम्मू-काश्मीरमध्ये संपादक शुजात बुखारी यांची काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळी घालून हत्या केल्यानंतर या प्रकरणामध्ये वाद वाढत आहे. रविवारी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपा आमदार लाल सिंह चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

लाल सिंह चौधरींच्या एका विधानाला प्रत्युत्तर देताना ओवेसी म्हणाले की, चौधरी यांना माहितीये बुखारींची हत्या कोणी केली, त्यामुळे पोलिसांनी त्यांची चौकशी करायला हवी. आम्ही नशीबवान आहोत की आम्ही हैदराबादमध्ये राहतो आणि येथे पत्रकारांना कोणताही धोका नाहीये अशी प्रतिक्रिया ओवेसी यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी भाजपाचे जम्मू येथील आमदार लाल सिंह यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना धमकी दिली होती. काश्मीरमध्ये पत्रकारांनी आपल्या मर्यादेत राहावं, त्यांनी आपली मर्यादा ओलांडू नये नाहीतर बुखारी यांच्यासारखा परिणाम भोगायला लागू शकतो असं चौधरी म्हणाले होते. काश्मीर खोऱ्यातील प्रतिमा पत्रकारांनीच खराब केल्याचंही ते म्हणाले होते. पत्रकारांनी पत्रकारिता करताना आपल्या मर्यादा ओळखून वागले पाहिजे. तुम्हाला माहित आहे शुजात बुखारींसोबत काय झाले? काश्मीरमधल्या पत्रकारांनी एक चुकीचे वातावरण निर्माण केले होते. आता मी काश्मीरच्या पत्रकारांना सांगेन की मर्यादेत राहा, आपला बंधुभाव जपा. मर्यादा तुमची तुम्हीच आखून घ्या म्हणजे तुमच्यातली एकी कायम राहिल असे वक्तव्य चौधरी यांनी केले होते.

लाल सिंह चौधरी हे महबुबा मुफ्तींच्या सरकारमध्ये मंत्रीही होते. मात्र, देशभरात गाजलेल्या कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणात आरोपींचं समर्थन केल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. यापूर्वी चौधरी यांच्या या वक्तव्यानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही भाजपावर टीका केली होती. पत्रकार बंधूंनो तुम्हाला भाजपा आमदाराकडून धमकीच मिळाली आहे. शुजात बुखारी यांचा मृत्यू हे आता गुंडगिरी करणाऱ्यांसाठी पत्रकारांविरोधातले हत्यार झाले आहे की काय अशीच स्थिती आहे अशा आशयाचे ट्विट ओमर अब्दुल्ला यांनी केले होते.

जम्मू काश्मीरचे ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांची १४ जूनला श्रीनगरमध्ये गोळी मारून हत्या करण्यात आली. प्रेस कॉलनीमध्ये असलेल्या आपल्या कार्यालयातून बुखारी हे एका इफ्तार पार्टीसाठी चालले होते. त्यावेळी त्यांना गोळ्या मारून त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येचा देशभरातून निषेध झाला.