लोकसभेमध्ये सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यामध्ये जोरदार शाब्दीक संघर्ष झाला. लोकसभेत सत्यपाल सिंह बोलत असताना असदुद्दीन ओवेसी यांनी अडथळा आणला. त्यावेळी अमित शाह आपल्या आसनावरुन उठून उभे राहिले व तुम्ही आधी का नाही बोललात? ओवेसी साब सुनने की भी आदत डालिए अशा शब्दात ओवेसींना खडेबोल सुनावले.

या शाब्दीक संघर्षाच्यावेळी मी कोणाला घाबरवत नाहीय पण कोणाच्या मनात भिती असेल तर मी काही करु शकत नाही असे अमित शाह ओवेसींना उद्देशून म्हणाले. एनआयए सुधारणा विधेयकावर संसदेत चर्चा सुरु असताना दोन्ही नेत्यामध्ये ही वादावादी झाली. भाजपाचे खासदार सत्यपाल सिंह बोलत असताना ओवेसींसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.

राज्यातील एका नेत्याने हैदराबादच्या पोलीस प्रमुखांना एका ठराविक प्रकरणात तपासाची दिशा बदलण्यास सांगितले होते. जर असे केले नाही तर बदली करण्याची धमकी दिली होती असा आरोप सत्यपाल सिंह यांनी केला. त्यावरुन वादावादीला सुरुवात झाली.

त्यावेळी मी मुंबईचा पोलीस आयुक्त असल्यामुळे मला या घडामोडींची कल्पना होती असे सिंह म्हणाले. त्यांच्या या विधानावर ओवेसी यांनी आक्षेप घेतला व पुरावे सादर करण्याची मागणी केली. त्यावर अमित शाह आपल्या जागेवरुन उठून उभे राहिले व दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी विरोधी सदस्यांनी संयम बाळगला पाहिजे असे ओवेसींना सुनावले. ओवेसी साब सुनने की भी आदत डालिए असे अमित शाह म्हणाले.