लंडन : जगप्रतिष्ठित ऑक्स्फर्ड शब्दकोशाने २०१८चा ‘वार्षिक शब्द’ म्हणून ‘टॉक्सिक’ या शब्दाची निवड केली आहे. जो शब्द त्या वर्षांतील समाजवास्तवाचे प्रतिनिधित्व करतो त्याची निवड दरवर्षी ऑक्स्फर्ड दरवर्षी ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून करते.

या वर्षी अनेक शहरांतले वातावरण प्रदूषणाने विषारी होते, राजकीय क्षेत्रही विषारी वक्तव्यांनी दूषित होते आणि ‘मीटू’सारख्या मोहिमेनेही विषारी पौरुषाचा प्रथमच उल्लेख केला. त्यामुळे हा शब्द या वर्षभरात विविध संदर्भात सातत्याने वापरात आल्याने त्याची निवड झाली.

‘गॅसलाइटनिंग’, ‘इन्सेल’, ‘टेकलॅश’ आणि ‘टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी’ हे शब्द निवड समितीसमोर अंतिम फेरीत आले होते. जगभर खळबळ उडवून दिलेल्या ‘मी टू’ मोहिमेने ‘टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी’ अर्थात विषारी पौरूष हा शब्द जन्माला घातला होता आणि तो सर्वाधिक प्रचलितही झाला. त्यामुळे या शब्दावर सर्वाचेच एकमत झाले. मात्र त्याचवेळी ‘टॉक्सिक’ हा शब्दच या वर्षांत कितीतरी संदर्भात वापरला गेल्याचा मुद्दा पुढे आला.

या वर्षांतील राजकीय नेत्यांची वाक् शैली विषारी झाली आहे, वातावरणाचा दर्जा विषारी झाला आहे आणि ‘मी टू’चा जन्म ज्या लिंगविखारी प्रवृत्तीविरोधात झाला त्या प्रवृत्तीतून बोकाळलेला विषारी मनोभाव.. अशा सर्वच पातळ्यांवर ‘टॉक्सिक’ हा शब्द अमर ठरला.

‘टॉक्सिक’ हा शब्द इंग्रजीत सर्वप्रथम सतराव्या शतकाच्या मध्यावर वापरात आला. त्याचा उगम लॅटिनमधील ‘टॉक्सिकस’ अर्थात ‘विषप्रयोग झालेला’ अथवा ‘विषारी’ या अर्थाच्या शब्दात होता. २०१८मध्ये ऑक्स्फर्डच्या संकेतस्थळावर या शब्दाच्या अर्थाचा शोध ४५ टक्क्यांनी वाढला होता. रशियात एका माजी हेरावर झालेल्या विषप्रयोगानंतर ‘टॉक्सिक केमिकल’ या शब्दाचा शोध वाढला होता. ऑक्टोबर २०१८मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने हवेच्या दर्जाचा मुलांवरील परिणामाचा आढावा घेणारा अहवाल प्रसिद्ध केला आणि त्यात ‘टॉक्सिक एअर’चा अनेकवार उल्लेख होता.